*बेलापूर–परळी रेल्वेसाठी अखेर आमरण उपोषणाला सुरुवात!*
*आश्वासनांनंतरही कृती नाही; कृती समितीचा निर्णायक लढा*

*बेलापूर–परळी रेल्वेसाठी अखेर आमरण उपोषणाला सुरुवात!*
*आश्वासनांनंतरही कृती नाही; कृती समितीचा निर्णायक लढा*
अहिल्यानगर | प्रतिनिधी
बेलापूर–परळी रेल्वेमार्गाच्या मागणीसाठी बेलापूर–परळी रेल्वे कृती समितीने आज, ९ ऑगस्ट २०२६ रोजी आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील निवासस्थानासमोर हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. रेल्वेमार्गाच्या मागणीसाठी लोकप्रतिनिधींनी यापूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण न झाल्याने समितीने आता आरपारच्या लढ्याची भूमिका घेतली आहे.
बेलापूर–परळी रेल्वेमार्गाचा प्रश्न २०२२ पासून केंद्रीय मंजुरीच्या प्रतीक्षेत असल्याचा कृती समितीचा दावा आहे. या मागणीसाठी समितीने यापूर्वीही आंदोलन केले आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये कुकाणा येथे सलग १३ दिवस आमरण उपोषण करण्यात आले होते. त्यानंतर ३० जून रोजी मुंबई मंत्रालयासमोरही उपोषण करण्यात आले होते. त्या वेळी बैठकीचे आश्वासन देऊन आंदोलन स्थगित करण्यात आले; मात्र अपेक्षित बैठक न झाल्याने समितीने पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
दोन वेळा आश्वासने; आता तिसरे आंदोलन
कृती समितीच्या म्हणण्यानुसार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील यांनी रेल्वेमार्गाच्या प्रश्नावर मुख्यमंत्री व केंद्रीय रेल्वेमंत्र्यांसोबत बैठक घडवून आणण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आश्वासनांची पूर्तता न झाल्याने आंदोलकांमध्ये नाराजी वाढली आहे. त्यामुळे यावेळी आमरण उपोषण मागे न घेण्याचा निर्धार समितीने व्यक्त केला आहे.
आता सर्वांचे लक्ष लोकप्रतिनिधींच्या भूमिकेकडे
बेलापूर–परळी रेल्वेमार्ग हा नेवासा तसेच परिसरातील नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचा प्रश्न मानला जात आहे. वारंवार आंदोलने करूनही प्रश्न मार्गी लागत नसल्याने आता सुरू झालेले आमरण उपोषण किती दिवस चालते आणि हे आंदोलन थांबवण्यात लोकप्रतिनिधी व शासनाला यश येते का, की ठोस निर्णय होईपर्यंत आंदोलक आपला लढा कायम ठेवतात, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
“आश्वासन नको, आता प्रत्यक्ष निर्णय हवा” अशी भूमिका घेत कृती समितीने आंदोलन सुरू केले असून, रेल्वेमार्गाच्या मागणीला आता निर्णायक वळण मिळण्याची शक्यता आहे




