*नेवासा येथे २६ जुलै रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’*
*महसूल विभागाच्या विविध योजनांचा लाभ एकाच छताखाली; नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन*

*नेवासा येथे २६ जुलै रोजी ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’*
*महसूल विभागाच्या विविध योजनांचा लाभ एकाच छताखाली; नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन*
नेवासा, प्रतिनिधी : महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने मुख्यमंत्री यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ रविवार, दि. २६ जुलै २०२६ रोजी सकाळी १० वाजता नेवासा येथील आराध्या लॉन्स, कोर्टासमोर, श्रीरामपूर रोड येथे आयोजित करण्यात आले आहे.
या विशेष शिबिरामध्ये महसूल विभागासह विविध शासकीय विभागांशी संबंधित नागरिकांच्या प्रलंबित कामांचा निपटारा, विविध दाखले, प्रमाणपत्रे, शासकीय योजनांची माहिती, अर्ज स्वीकृती, मार्गदर्शन तसेच लाभार्थींना विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक शासकीय कार्यालयांचे हेलपाटे न मारता एकाच ठिकाणी विविध सेवांचा लाभ घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे.
या शिबिराचे अध्यक्षस्थान नेवासा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील भूषविणार असून प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया (भा.प्र.से.), अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील, तहसीलदार डॉ. संजय बिरादार तसेच अपर तहसीलदार तथा प्रभारी उपजिल्हाधिकारी सोनाली भात्रे यांची उपस्थिती लाभणार आहे.
महसूल प्रशासन नागरिकाभिमुख करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरातून शासनाच्या सेवा अधिक वेगाने व पारदर्शक पद्धतीने नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जमीन, सातबारा, फेरफार, उत्पन्न, जात, रहिवासी दाखले, तसेच विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन व आवश्यक सेवा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याने परिसरातील नागरिकांनी या संधीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
तालुका प्रशासन, नेवासा यांच्या वतीने आयोजित या महसूल समाधान शिबिरात सर्व नागरिक, शेतकरी, विद्यार्थी, महिला व लाभार्थींनी आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून शासनाच्या सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




