Breaking
ई-पेपर

*नेवासा तालुक्याच्या विकासाचे स्टेअरिंग आमदार लंघे यांच्या हातात : नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले पाटील*

*आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या हस्ते ‘राजमाता जिजाऊ’ बससेवेचा लोकार्पण सोहळा; नेवासा आगारात नव्या पाच बसेस दाखल*

0 8 9 9 1 8

*नेवासा तालुक्याच्या विकासाचे स्टेअरिंग आमदार लंघे यांच्या हातात : नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले पाटील*

*आमदार विठ्ठलराव लंघे यांच्या हस्ते ‘राजमाता जिजाऊ’ बससेवेचा लोकार्पण सोहळा; नेवासा आगारात नव्या पाच बसेस दाखल*

नेवासा प्रतिनिधी :

नेवासा तालुक्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला आणखी बळकटी देणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नव्या पाच ‘राजमाता जिजाऊ’ बससेवेचा लोकार्पण सोहळा ८०व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभमुहूर्तावर नेवासा बसस्थानकात उत्साहात पार पडला. आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या हस्ते या बससेवेचा लोकार्पण सोहळा झाला. विशेष म्हणजे आमदार लंघे यांनी स्वतः बसचे स्टेअरिंग हाती घेत बस चालवत या सेवेचे लोकार्पण केले.
यावेळी बोलताना आमदार विठ्ठलराव लंघे पाटील म्हणाले की, नेवासा तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिक, विद्यार्थी, महिला, नोकरदार आणि सर्वसामान्य प्रवाशांसाठी एसटी ही जीवनवाहिनी आहे. प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा मिळावी, यासाठी आपण सातत्याने प्रयत्नशील आहोत. ‘राजमाता जिजाऊ’ यांच्या नावाने सुरू झालेली ही बससेवा महिला शक्ती, स्वाभिमान आणि महाराष्ट्राच्या गौरवशाली परंपरेचे प्रतीक आहे.
नेवासा तालुक्यासाठी यापूर्वी दहा नवीन बसेस मिळविण्यात यश आले असून आता आणखी पाच बसेसची भर पडली आहे. त्यामुळे नेवासा तालुक्याच्या एसटी सेवेला मोठे बळ मिळाले असून आतापर्यंत एकूण पंधरा नवीन बसेस तालुक्याला प्राप्त झाल्या आहेत. या बसेसच्या माध्यमातून नेवासा तालुक्यातील ग्रामीण भागाची शहरांशी तसेच महाराष्ट्राच्या विविध भागांशी जोडणी अधिक सक्षम होणार असल्याचे आमदार लंघे यांनी सांगितले.
‘लाल परी’ ही केवळ प्रवासाचे साधन नसून ग्रामीण भागातील जनतेला शिक्षण, रोजगार, बाजारपेठ आणि विविध शासकीय सुविधांशी जोडणारी महत्त्वाची सेवा आहे. आपल्या विद्यार्थी जीवनातही एसटीने प्रवास केला असून ग्रामीण भागातील सामान्य माणसाच्या जीवनात एसटीचे महत्त्व आपण जवळून अनुभवले आहे, असेही आमदार लंघे म्हणाले.
नेवासा आगारातील एसटी कर्मचाऱ्यांसाठी आगामी काळात सुसज्ज एसटी डेपो, कर्मचारी निवासाची सुविधा तसेच स्वच्छतागृहांसह आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल, अशी ग्वाहीही आमदार लंघे यांनी दिली. यावेळी त्यांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या.
यावेळी नेवासा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले पाटील म्हणाले की, कार्यधुरंधर आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून ८०व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभमुहूर्तावर नेवासा आगारात कोऱ्या करकरीत पाच नवीन बसेस दाखल झाल्या आहेत. या बसेससाठी आमदार लंघे यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले असून नेवासा तालुक्याला इतिहासात प्रथमच आतापर्यंत पंधरा नवीन बसेस मिळाल्या आहेत.
नेवासा तालुक्याच्या विकासकामांना गती देण्यासाठी आमदार लंघे सातत्याने पाठपुरावा करीत असून नेवासकरांच्या विकासाचे ‘स्टेअरिंग’ आता आमदार लंघे यांच्या हातात आले आहे, असे गौरवोद्गार नगराध्यक्ष डॉ. करणसिंह घुले पाटील यांनी काढले.
या लोकार्पण सोहळ्यास प्रवासी संघटनेचे अध्यक्ष अनिल ताके, डॉ. निलेश लोखंडे, माजी सभापती शंकरराव लोखंडे, माऊली पेचे, अंकुश म्हस्के, आदिनाथ पटारे, प्रवीण सरोदे, अनिल पवार, कृष्णा परदेशी, संदीप सरकाळे, नितीन जगताप, भाऊसाहेब वाघ, बाळासाहेब पवार, ॲड. कर्डक भाऊसाहेब, ॲड. मयूर वाखुरे, रवींद्र पिंपळे यांच्यासह प्रशासनाच्या वतीने तहसीलदार संजय बिराजदार, दुर्योधन सुदर्शन, संजय लखवाल, चांगदेव बोरुडे, सोनाली म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
नवीन पाच बसेसच्या आगमनामुळे नेवासा आगाराच्या वाहतूक व्यवस्थेला अधिक बळ मिळाले असून ग्रामीण भागातील प्रवाशांना याचा मोठा लाभ होणार आहे. त्यामुळे नेवासा तालुक्याच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या दृष्टीने हा दिवस महत्त्वपूर्ण ठरला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 1 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे