*भानसहिवरा येथे लाळ खुरकूत प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ; पशुपालकांना लसीकरणाचे आवाहन*

*भानसहिवरा येथे लाळ खुरकूत प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ; पशुपालकांना लसीकरणाचे आवाहन*
नेवासा | प्रतिनिधी :
पशुधनाला लाळ खुरकूत या संसर्गजन्य आजारापासून सुरक्षित ठेवण्यासाठी पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद अहिल्यानगर आणि पंचायत समिती नेवासा यांच्या संयुक्त विद्यमाने केंद्र पुरस्कृत लाळ खुरकूत रोग प्रतिबंधक लसीकरण फेरी क्रमांक ९ या मोहिमेला भानसहिवरा येथे उत्साहात सुरुवात झाली. सरपंच सौ. मीनाताई किशोर जोजर यांच्या उपस्थितीत लसीकरण मोहिमेचे उद्घाटन करण्यात आले.
तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील तसेच आदर्श पशुपालक पुरस्कारप्राप्त माजी उपसभापती किशोर भाऊ जोजर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी भानसहिवरा परिसरातील पशुपालक, ग्रामस्थ तसेच पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लाळ खुरकूत हा पशुधनामध्ये वेगाने पसरणारा संसर्गजन्य आजार असून, त्याचा प्रादुर्भाव झाल्यास पशुधनाच्या आरोग्यावर तसेच पशुपालकांच्या आर्थिक उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक लसीकरण अत्यंत महत्त्वाचे असल्याचे पशुसंवर्धन विभागाने स्पष्ट केले आहे.
पुढील ४५ दिवस संपूर्ण महाराष्ट्रासह नेवासा तालुक्यात लाळ खुरकूत प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या कालावधीत तालुक्यातील प्रत्येक पशुपालकाने आपल्या सर्व पात्र पशुधनाचे लसीकरण करून घ्यावे आणि मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी गटविकास अधिकारी संजय लखवाल, जिल्हा पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभागाचे उपयुक्त डॉ. उमेश पाटील, सहाय्यक आयुक्त डॉ. मुकुंद राजळे, सहाय्यक आयुक्त तथा तालुका पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय अधिकारी डॉ. राजेंद्र शेटे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल गायकवाड, डॉ. एस. बी. सोनवणे, पशुधन पर्यवेक्षक डॉ. संतोष मासाळ यांच्यासह तालुक्यातील पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
पशुधन निरोगी तर पशुपालक आर्थिकदृष्ट्या सक्षम, या उद्देशाने प्रत्येक पशुपालकाने लसीकरण मोहिमेत सहभागी होऊन आपल्या पशुधनाचे संरक्षण करावे, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.
