*कु.प्राजक्ताचे यश ग्रामीण भागातील युवक-युवतींसाठी प्रेरणादायी — आ. विठ्ठलराव लंघे*
*प्रशासकीय तीन पदांवर निवड; कुकाणा-नेवासा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा*

*कु.प्राजक्ताचे यश ग्रामीण भागातील युवक-युवतींसाठी प्रेरणादायी — आ. विठ्ठलराव लंघे*
प्रशासकीय तीन पदांवर निवड; कुकाणा-नेवासा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा
नेवासा प्रतिनिधी :- महाराष्ट्र 7न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) संयुक्त गट-ब परीक्षा २०२५ मध्ये उल्लेखनीय यश संपादन करून दुय्यम निबंधक श्रेणी-१, कर उपनिरीक्षक आणि सहायक कक्ष अधिकारी या तीन पदांसाठी निवड झालेल्या कु. प्राजक्ता संजय कचरे हिचा साईश्रद्धा लॉन्स, कुकाणा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव सोहळा उत्साहात पार पडला.
प्रतिकूल परिस्थितीतही ध्येय निश्चित करून सातत्याने केलेली मेहनत, अभ्यासातील चिकाटी आणि आत्मविश्वासाच्या बळावर प्राजक्ताने मिळवलेले यश निश्चितच प्रेरणादायी असून, तिच्या यशामुळे कुकाणा आणि नेवासा तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. तिच्या यशातून ग्रामीण भागातील अनेक युवक-युवतींना मोठी स्वप्ने पाहून ती पूर्ण करण्यासाठी मेहनत करण्याची प्रेरणा मिळेल, असे प्रतिपादन आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी केले.
साईश्रद्धा लॉन्स, कुकाणा येथे आयोजित यशाच्या गौरव सोहळ्यात आमदार लंघे यांच्या हस्ते कु. प्राजक्ता संजय कचरे हिचा सन्मान करण्यात आला. यावेळी तिच्या उल्लेखनीय यशाचे कौतुक करत आमदार लंघे यांनी तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. देसाई देशमुख होते. व्यासपीठावर म्हणतं सुनिलगिरीजी महाराज, प्रा. जयश्रीताई गडाख, आशाताई मुरकुटे, भैय्यासाहेब देशमुख, अभियंता बाळासाहेब कचरे, कॉब्रेड बाबासाहेब अरगडे, डॉ. नरवडे, काशिनाथ अण्णा नवले, दिनकरराव गर्जे, बाजीराव मुंगसे, मछिंद्र कावरे, सरपंच लता अभंग, अमोल अभंग आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून प्राजक्ताला शुभेच्छा दिल्या.
ग्रामीण मुलींना शिक्षणाची संधी मिळाल्यास त्या यशाचे शिखर गाठू शकतात : ॲड. देसाई देशमुख
पूर्वी ग्रामीण भागातील मुलींना शिक्षणाच्या पुरेशा संधी उपलब्ध होत नव्हत्या. मात्र, आता परिस्थिती बदलली असून पालक मुलींना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देत आहेत. मुलींना यशस्वी करण्यासाठी कुटुंबीय प्रयत्नशील असल्याचे प्राजक्ताच्या यशातून दिसून येते. तिच्या यशामुळे गावासह तालुक्याचे नाव मोठे झाले आहे. तिच्या यशामध्ये कुटुंबाचा मोठा वाटा असून, तिची जिद्द आणि चिकाटी कौतुकास्पद आहे. भविष्यात तिच्या हातून समाजाला प्रेरणा देणारे कार्य निश्चितच घडेल, असा विश्वास ॲड. देसाई देशमुख यांनी व्यक्त केला.

“हे यश माझे नसून संपूर्ण कुटुंबाचे” — कु. प्राजक्ता कचरे
आपल्या मनोगतात कु. प्राजक्ता कचरे म्हणाली, “मला मिळालेले यश हे माझ्या कुटुंबातील सर्वांनी दिलेल्या साथीमुळे शक्य झाले. माझ्या आई-वडिलांमुळेच मी आज तुमच्यासमोर उभी आहे. आयुष्यातील कठीण काळात कुटुंबाने मला खंबीरपणे साथ दिली. घरातील वातावरण सुरुवातीपासूनच शिक्षणासाठी पोषक होते. माझे चुलते आणि कुटुंबातील इतर सदस्य उच्चशिक्षित असल्याने त्यांचे मार्गदर्शन मिळाले. त्यामुळे या यशामध्ये माझ्या कुटुंबाचे योगदान मोठे आहे. मिळालेले यश केवळ माझे नसून संपूर्ण कुटुंबाचे आहे.”

या गौरव सोहळ्यास कुटूंबातील सर्व सदस्य नातेवाईक व तालुक्यातील विविध क्षेत्रांतील मान्यवर, विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच कुकाण्यासह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी प्राजक्ताचे अभिनंदन करून तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सौ. संजोग रवींद्र कचरे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. संजय चव्हाण यांनी केले, तर आभार रवींद्र कचरे यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कचरे परिवारातील सदस्यांनी व मित्रपरिवाराने परिश्रम घेतले.




