*कुकाणा-नांदूर शिकारी रस्त्याची दयनीय अवस्था; शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर*
*कुकाणा-नांदूर शिकारी रस्त्याची दयनीय अवस्था; शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर*
नेवासा , प्रतिनिधी : महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
कुकाणा-नांदूर शिकारी मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनचालकांसह नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विशेषतः नांदूर शिकारी येथील जिल्हा परिषद शाळेजवळ रस्त्याची अवस्था खराब असल्याने शाळकरी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.
रस्त्यावरून भरधाव वेगाने वाहने ये-जा करत असल्यामुळे शाळेत येणाऱ्या-जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अपघाताचा धोका वाढला आहे. रस्त्यावर खड्डे असल्याने वाहनचालक अचानक वाहन वळवतात, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता अधिक निर्माण होत आहे.

या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते साजित लिपणे यांनी संबंधित प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. शाळेजवळ विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी गतिरोधक (स्पीड ब्रेकर) उभारण्यात यावेत, तसेच रस्त्याची त्वरित दुरुस्ती करून खड्डे बुजविण्यात यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
स्थानिक नागरिकांनीही याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाने आणि संबंधित प्रशासनाने तात्काळ उपाययोजना कराव्यात, अन्यथा लोकआंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशारा ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.
“शाळकरी विद्यार्थ्यांच्या जीविताची जबाबदारी कोण घेणार?” असा प्रश्न उपस्थित करत नागरिकांनी प्रशासनाकडून त्वरित कार्यवाहीची अपेक्षा व्यक्त केली आहे




