Breaking
ई-पेपर

बेलापूर-परळी रेल्वे मार्गाला तात्काळ मंजुरी मिळावी म्हणून कुकाणा येथे आमरण उपोषण सुरू

0 6 0 5 0 6

बेलापूर-परळी रेल्वे मार्गाला तात्काळ मंजुरी मिळावी म्हणून कुकाणा येथे आमरण उपोषण सुरू

कुकाणा प्रतिनिधी –

बेलापूर (श्रीरामपूर)-परळी रेल्वे मार्गाला केंद्र सरकारकडून तात्पुरती स्थगिती देण्यात आल्याच्या निषेधार्थ रेल्वे कृती समितीने आजपासून कुकाणा येथे ग्रामपंचायत प्रांगणात आमरण उपोषण सुरू केले आहे. या मार्गाला त्वरित मंजुरी मिळावी आणि काम सुरू व्हावे, या मागणीसाठी हे आंदोलन तीव्र करण्यात आले आहे.

रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष रितेश भंडारी यांनी उपोषणस्थळी सांगितले की, बेलापूर-परळी हा रेल्वे मार्ग केंद्र सरकारकडून मंजुरीसाठी प्रलंबित ठेवण्यात आला आहे. तोट्यात जाणाऱ्या अनेक रेल्वे मार्गांना मंजुरी देऊन या मार्गाला जाणीवपूर्वक आडकाठी आणली जात आहे. सर्वेक्षण पूर्ण होऊन जून २०२२ मध्ये अहवाल केंद्रीय रेल्वे बोर्डाकडे सादर झाला असला तरी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी गेल्या तीन वर्षांपासून मंजुरी रोखून ठेवली आहे.

भंडारी यांनी पुढे आरोप केला की, सोलापूर-तुळजापूर-धाराशिव, तसेच इतर मार्गांचा आरओआर (रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट) बेलापूर-परळी मार्गापेक्षा दुप्पट कमी असतानाही त्यांना मंजुरी मिळाली आणि काम प्रगतीपथावर आहे. या सर्व बाबी पुराव्यानिशी केंद्रीय रेल्वेमंत्री आणि रेल्वे बोर्डाच्या चेअरमन यांना कळविल्या असूनही जाणीवपूर्वक दिरंगाई केली जात आहे.

राज्य सरकारकडून फसवणूक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१७ मध्ये समितीच्या आंदोलनादरम्यान व्यक्तिशः लक्ष घालण्याचे लेखी आश्वासन दिले होते. आठ वर्षे उलटूनही त्याची पूर्तता झाली नाही. यामुळे केंद्र आणि राज्य सरकारकडून जनतेची मोठी फसवणूक झाली आहे, असा आरोप भंडारी यांनी केला.

पूर्वीची आंदोलने आणि सध्याचे उपोषण
या मार्गासाठी रेल्वे कृती समितीने यापूर्वी डिसेंबर २०१७ मध्ये सात दिवसांचे आमरण उपोषण, ऑगस्ट २०१८ मध्ये मुंबईत मंत्रालयात आत्मदहनाचा प्रयत्न आणि डिसेंबर २०१८ मध्ये पाच दिवसांचे उपोषण केले होते. तरीही केंद्र व राज्य सरकारकडून दिरंगाई सुरूच आहे.

निवेदने आणि पाठिंबा
उपोषणाचे निवेदन पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे बोर्ड चेअरमन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, नगरचे खासदार निलेश लंके, बीडचे खासदार बजरंग सोनवणे, श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले, नेवाशाचे आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, शेवगाव-पाथर्डीचे आमदार मोनिका राजळे, गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित, माजलगावचे आमदार प्रकाश सोळुंके, परळीचे आमदार धनंजय मुंडे यांना देण्यात आले आहे.

उपोषणास रितेश भंडारी, रज्जाक इनामदार, सुरेश नरवणे बसले असून, गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला आहे. नेवासे मतदार संघाचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी उपोषणास भेट देऊन जाहीर पाठिंबा व्यक्त केला.

रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा
सोमवारी रेल्वे बोर्डाच्या गोपनीय शाखेचे सुनील कांबळे आणि सचिन नागरगोजे यांनी उपोषणार्थ्यांशी चर्चा केली. मात्र, प्रत्यक्ष काम सुरू होईपर्यंत किंवा ठोस आश्वासन मिळेपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचे कृती समितीने स्पष्ट केले.

हा १०४ वर्षांपासून प्रलंबित असलेला रेल्वे मार्ग मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाचा प्रकल्प आहे. स्थानिक जनतेला रेल्वे सुविधेच्या प्रतीक्षेत वर्षानुवर्षे ताटकळत ठेवले जात असल्याने आंदोलन तीव्र होण्याची शक्यता आहे

5/5 - (1 vote)

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 0 5 0 6

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे