मातृशाळेचे ऋण फेडले; माजी विद्यार्थ्याने दिली शाळेला एक लाखांची देणगी..
जि.प. प्राथमिक शाळा देवसडे हायटेक करण्यासाठी पुढाकार..

मातृशाळेचे ऋण फेडले; माजी विद्यार्थ्याने दिली शाळेला एक लाखांची देणगी..
जि.प. प्राथमिक शाळा देवसडे हायटेक करण्यासाठी पुढाकार..
नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
नेवासा तालुक्यातील जि.प. प्राथमिक शाळा देवसडे या शाळेचे माजी विद्यार्थी विष्णू लक्ष्मणराव फटांगरे पाटील,राज्य संघटक – महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघ व सेवानिवृत्त अवर सचिव मंत्रालय यांनी आपल्या मातृशाळेच्या शैक्षणिक प्रगतीसाठी एक लाख रुपयांची उदारपणे देणगी देऊन सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण घालून दिले आहे.
अत्यंत कठीण परिस्थितीत शिक्षण घेतलेल्या विष्णू फटांगरे पाटील यांनी बालपणापासूनच जिद्द आणि परिश्रमाच्या जोरावर शिक्षणात उल्लेखनीय यश संपादन केले. घरची आर्थिक परिस्थिती प्रतिकूल असतानाही त्यांनी सातवी इयत्तेत शिष्यवृत्ती मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली. पुढे उच्च शिक्षण पूर्ण करून त्यांनी मंत्रालय पातळीवर महत्त्वाच्या पदांवर कार्य करत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.
उच्च पदावर कार्यरत असतानाही त्यांनी आपल्या गावाला आणि मातृशाळेला कधीही विसरले नाही. बालपणी स्वतःला शैक्षणिक सुविधा मिळाल्या नाहीत; मात्र आजच्या विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात आणि त्यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन करून उच्च पदांवर पोहोचावे, या उद्देशाने त्यांनी ही देणगी दिली आहे.
या देणगीतून माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेले ‘ *कुसुमाग्रज बाल वाचनालय* ’ अधिक समृद्ध करण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य, स्पर्धा परीक्षांसाठी पूरक साहित्य उपलब्ध करून देणे आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना आनंदी व प्रेरणादायी वातावरणात शिक्षण घेता यावे यासाठीही या निधीचा उपयोग करण्यात येणार आहे.
इतर माध्यमांच्या खाजगी शाळांच्या तोलामोलाचे शैक्षणिक वातावरण जि.प. प्राथमिक शाळा देवसडे येथे निर्माण व्हावे, हीच आपली इच्छा असल्याचे मत विष्णू पा. फटांगरे यांनी व्यक्त केले.
शाळेच्या प्रगतीसाठी दिलेल्या या देणगीबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी , जिल्हा शिक्षण अधिकारी भास्कर पाटील , नेवासा गटशिक्षणाधिकारी संजय कळमकर, तालुका विस्तार अधिकारी भागिनाथ बडे तसेच केंद्रप्रमुख सौ. कमल लाटे तसेच शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व उपाध्यक्ष, सदस्य मंडळ तसेच मुख्याध्यापक व शिक्षकांनी यांनी श्री. विष्णू पा. फटांगरे यांचे अभिनंदन केले.




