*बेलवंडी पोलिसांकडून खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप; मोक्का प्रस्तावाविरोधात राजेंद्र उबाळे यांचे उपोषण*
*दुसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच*

बेलवंडी पोलिसांकडून खोटा गुन्हा दाखल केल्याचा आरोप; मोक्का प्रस्तावाविरोधात राजेंद्र उबाळे यांचे उपोषण
अहिल्यानगर :महाराष्ट्र 7न्यूज नेटवर्क
बेलवंडी पोलीस ठाण्यात आपल्याविरुद्ध खोटा गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकच गुन्हा असतानाही आपल्यावर बेकायदेशीररीत्या मोक्का कारवाईचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याचा आरोप करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)चे पारनेर तालुकाध्यक्ष आयु. राजेंद्र मधुकर उबाळे यांनी सोमवारी (दि. ७ सप्टेंबर) जिल्हाधिकारी कार्यालय, अहिल्यानगर येथे आमरण उपोषण सुरू केले.
उबाळे यांनी दिलेल्या निवेदनानुसार, बेलवंडी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांच्यासह संबंधित पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी तसेच त्यांच्या संपत्तीची चौकशी करावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे.
आपल्यावर ज्या पद्धतीने खोटे गुन्हे दाखल करून उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करण्यात आला, त्याच पद्धतीने कोणत्याही सामाजिक कार्यकर्त्यावर भविष्यात खोटे गुन्हे दाखल करू नयेत, अशी मागणीही उबाळे यांनी केली आहे.
तसेच, पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांनी वारंवार मोक्काची धमकी देऊन व मोक्कातून वगळण्याच्या नावाखाली आपली आर्थिक लूट केल्याचा गंभीर आरोप उबाळे यांनी निवेदनातून केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी व त्यांच्या कुटुंबीयांच्या संपत्तीची चौकशी करावी आणि दोषी आढळल्यास गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मागण्यांची पूर्तता होईपर्यंत आमरण उपोषण सुरू ठेवण्याचा इशारा उबाळे यांनी दिला असून, या प्रकरणाकडे प्रशासन काय भूमिका घेते, याकडे आता लक्ष लागले आहे.




