*सरला बेटाचा प्रमुख तीर्थस्थळ म्हणून सर्वांगीण विकास करणार; मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्धार*
‘*हरिनामाच्या परंपरेने भारताची संस्कृती-संस्कार अखंड ठेवले; संतांना धमकी देणाऱ्यांची गय नाही’*

*सरला बेटाचा प्रमुख तीर्थस्थळ म्हणून सर्वांगीण विकास करणार; मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्धार*
‘*हरिनामाच्या परंपरेने भारताची संस्कृती-संस्कार अखंड ठेवले; संतांना धमकी देणाऱ्यांची गय नाही’*
अहिल्यानगर :
हजारो वर्षांच्या आक्रमणांनंतरही भारताची संस्कृती, संस्कार आणि सनातन विचार अबाधित राहण्यामागे वारकरी, हरिनाम आणि संतांची गुरुपरंपरा हीच मोठी शक्ती आहे. योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज यांनी सुरू केलेली १७९ वर्षांची अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा आजही महंत रामगिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अध्यात्म, संस्कार आणि सज्जनशक्ती जागृत ठेवण्याचे कार्य करीत आहे. या आध्यात्मिक परंपरेला बळ देत सरला बेटाचा महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थस्थळ म्हणून सर्वांगीण विकास केल्याशिवाय सरकार थांबणार नाही, असा निर्धार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
राहाता तालुक्यातील श्रीक्षेत्र धनगरवाडी येथे योगीराज सद्गुरू श्री गंगागिरीजी महाराज यांच्या १७९ व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी त्यांनी वारकरी संप्रदाय, हरिनामाचे महत्त्व, सरला बेटाचा विकास, शेतकरी हिताचे निर्णय आणि संतांच्या सुरक्षेबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केली.
संतपरंपरेने भारतीय संस्कृती जिवंत ठेवली
भारतावर हजारो वर्षे आक्रमणे झाली. किल्ले जिंकले गेले, मंदिरे पाडली गेली; मात्र भारतीयांच्या मनातील ईश्वराचे स्थान कोणीही बदलू शकले नाही. वारकरी, हरिनाम आणि सनातन परंपरेमुळे भारतीयांनी आपला विचार, संस्कार आणि जीवनमार्ग कायम जपला. संतांनी दिलेल्या गुरुपरंपरेमुळे भारतीय समाजाला मानसिकदृष्ट्या कोणीही गुलाम करू शकले नाही, असे फडणवीस म्हणाले.
आषाढीच्या निमित्ताने कोणत्याही निमंत्रणाची गरज नसताना वारकऱ्यांची पावले पंढरपूरकडे वळतात. आक्रमणे अनेक झाली, मात्र वारकऱ्यांची ही पावले आणि हरिनामाचा गजर कोणीही थांबवू शकले नाही. ज्ञानेश्वर माऊलींपासून जगद्गुरू तुकाराम महाराजांपर्यंत संतांनी दिलेली हीच भक्तीची परंपरा आजही समाजाला एकत्र बांधून ठेवत असल्याचे त्यांनी नमूद केले.
हरिनामामुळे ‘मी’पणा नष्ट होतो
हरिनामाच्या संकीर्तनामुळे माणसामधील ‘मी’पणा नष्ट होतो आणि सर्वजण एकरूप होतात. तेथे स्वार्थ, जात-पात यांना स्थान राहत नाही; प्रत्येकामध्ये विठ्ठल आणि हरीचा वास पाहण्याची दृष्टी निर्माण होते. आजच्या काळात हरिकीर्तन आणि संकीर्तनापेक्षा जीवनाला योग्य दिशा देणारा मोठा मार्ग दुसरा नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
महंत रामगिरीजी महाराज यांनी उभा केलेला संप्रदाय महाराष्ट्राची आणि भारताची सज्जनशक्ती म्हणून कार्य करीत असून, अध्यात्म, संस्कृती आणि संस्कार पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचविण्याचे मोठे काम करीत असल्याबद्दल त्यांनी महंत रामगिरीजी महाराज यांचे कौतुक केले.
सरला बेट विकास आराखड्याचे काम सुरू
सरकारने सरला बेटाच्या सर्वांगीण विकासाचा निर्णय घेतला असून, त्यासाठी विकास आराखडा तयार करून कामाला सुरुवात करण्यात आली आहे. हॉल, रस्ते आणि पूरसंरक्षणाची कामे सुरू आहेत. आगामी काळात हा विकास पूर्ण झाल्यानंतर सरला बेट महाराष्ट्रातून येणाऱ्या भाविकांसाठी अध्यात्मिक ऊर्जेचे महत्त्वाचे केंद्र बनेल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
सरला बेटावर सौरऊर्जेची व्यवस्था उभारण्याचे कामही हाती घेण्यात येणार असून, महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थस्थळ म्हणून सरला बेटाचा विकास पूर्ण केल्याशिवाय सरकार थांबणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
शेतकरी हितासाठी सरकार कटिबद्ध
आध्यात्मिक शक्ती आणि सज्जनशक्तीच्या आशीर्वादामुळे महाराष्ट्रात महायुतीला विजय मिळाला असून, शेतकरी, वारकरी, शेतमजूर, गरीब, दलित आणि आदिवासी अशा सर्व घटकांना सोबत घेऊन राज्यकारभार करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाची अंमलबजावणी सुरू असून, आतापर्यंत साडेबारा लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये रक्कम जमा करण्यात आली आहे. दर पंधरा दिवसांनी नवीन यादी जाहीर करून लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जात असून, ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा उपक्रम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, ३६५ दिवस दिवसा वीज उपलब्ध करून देण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. सध्या ७५ टक्के शेतकऱ्यांपर्यंत दिवसा वीज पोहोचली असून, ही सुविधा १०० टक्के शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात येईल. तसेच शेतकऱ्यांची ५८ हजार कोटी रुपयांची थकीत वीजबिले माफ करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘संतांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही’
महंत रामगिरीजी महाराज यांना धमक्या देणाऱ्यांविरोधात मुख्यमंत्री फडणवीस यांनी कठोर भूमिका मांडली. “संतांना धमक्या देण्याचे काम कोणी केले तर त्याची गय केली जाणार नाही. संतांच्या केसालाही धक्का लागू देणार नाही,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
संत, वारकरी आणि आध्यात्मिक परंपरेचे रक्षण करणे ही सरकारची जबाबदारी असून, समाजाने स्वीकारलेल्या सन्मार्गावर चालण्यापासून कोणतीही शक्ती रोखू शकत नाही, असा विश्वासही मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.
अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्याच्या भक्तिमय वातावरणात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. सरला बेटाच्या विकासाची मुख्यमंत्र्यांनी दिलेली ग्वाही ही या परिसरातील भाविकांसाठी आणि वारकरी संप्रदायासाठी महत्त्वपूर्ण घोषणा ठरली.



