*ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्यास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची उपस्थितीची ग्वाही*
*लोणी येथे सोहळा प्रतिनिधी मंडळाची सदिच्छा भेट; ८ जुलैच्या ऐतिहासिक प्रस्थान सोहळ्याचे निमंत्रण स्वीकारले*

*ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्यास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची उपस्थितीची ग्वाही*
*लोणी येथे सोहळा प्रतिनिधी मंडळाची सदिच्छा भेट; ८ जुलैच्या ऐतिहासिक प्रस्थान सोहळ्याचे निमंत्रण स्वीकारले*
श्रीक्षेत्र नेवासा | प्रतिनिधी- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
श्रीक्षेत्र नेवासा येथून ८ जुलै २०२६ रोजी पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या ऐतिहासिक ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची आज लोणी येथे सोहळा प्रतिनिधी मंडळाने सदिच्छा भेट घेतली. यावेळी पालकमंत्र्यांना प्रस्थान सोहळ्याचे अधिकृत निमंत्रण देण्यात आले असून, “मी स्वतः या सोहळ्यास उपस्थित राहण्याचा प्रयत्न करेन,” अशी सकारात्मक ग्वाही त्यांनी दिली. त्यामुळे वारकरी संप्रदायासह सोहळा समितीमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
सायंकाळी ४ वाजता झालेल्या या भेटीत संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त ह.भ.प. वेदांताचार्य देविदास महाराज म्हस्के, सोहळा समितीचे नवनिर्वाचित सदस्य ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक, संस्थानचे अध्यक्ष व माजी आमदार पांडुरंग अभंग, विश्वस्त कैलासभाऊ जाधव, तसेच कृष्णा आण्णा पिसोटे आणि हरि महाराज भोगे उपस्थित होते.
प्रतिनिधी मंडळाने पालकमंत्र्यांना यंदाच्या पालखी सोहळ्याचे नियोजन, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या विचारांचा प्रसार, वारकरी परंपरेचे जतन आणि समाजात समता, भक्ती व संस्कारांचा संदेश पोहोचविण्याच्या उद्देशाबाबत सविस्तर माहिती दिली.
यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी सोहळ्याच्या कार्याचे कौतुक करत, “ज्ञानेश्वरीचा विचार हा समाजाला दिशा देणारा आहे. अशा पवित्र परंपरेशी जोडले जाणे ही भाग्याची बाब असून, शासनाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य राहील,” असे आश्वासन दिले.
दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो वारकरी, भाविक आणि संतप्रेमी या सोहळ्यात सहभागी होणार असून, त्यांच्या सोयीसाठी शासन व जिल्हा प्रशासनाने व्यापक नियोजन केले आहे. पिण्याचे पाणी, आरोग्य सेवा, सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता आणि वाहतूक व्यवस्थेसह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचा संदेश हा केवळ अध्यात्मापुरता मर्यादित नसून तो ज्ञान, समता, भक्ती, संस्कार आणि सामाजिक ऐक्याचा अखंड दीपस्तंभ आहे. या संदेशाचा प्रसार करणारा हा पालखी सोहळा दिवसेंदिवस अधिक व्यापक होत असून, लोकसहभागातून तो राज्यातील एक आदर्श धार्मिक-सांस्कृतिक उपक्रम म्हणून ओळख निर्माण करत आहे.
पालकमंत्र्यांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद, शासनाचे सहकार्य आणि वारकरी संप्रदायाचा उत्साह यामुळे ८ जुलै रोजी श्रीक्षेत्र नेवासा येथून निघणारा ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पालखी प्रस्थान सोहळा यंदा ऐतिहासिक, भव्य, दिमाखदार आणि भक्तिमय वातावरणात पार पडेल, असा विश्वास सोहळा समितीने व्यक्त केला.
— संकेत गवळी




