*प्रहारची बॅट जिल्हा परिषद गट-गणात फिरणार – युवक जिल्हाप्रमुख पांडुरंग औताडे*
अहिल्यानगर | प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रहार जनशक्ती पक्ष पूर्ण ताकदीने निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. “प्रहारची बॅट जिल्हा परिषद गट-गणात फिरणार” असा ठाम निर्धार व्यक्त करत प्रहार जनशक्ती पक्षाचे युवक जिल्हाप्रमुख पांडुरंग औताडे यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात पक्षाची दिशा, भूमिका आणि आगामी कृतीआराखडा जाहीर केला.
पांडुरंग औताडे म्हणाले की, अहिल्यानगर जिल्ह्यात शेतकरी, दिव्यांग, युवक, महिला तसेच सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. पाणी, वीज, रस्ते, आरोग्य, शिक्षण, बेरोजगारी, शेतमालाला योग्य भाव, धरणग्रस्तांचे पुनर्वसन आणि दिव्यांगांच्या योजनांची अंमलबजावणी या विषयांकडे सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. या प्रश्नांना केवळ आंदोलने करून न्याय मिळत नाही; त्यामुळे आता थेट निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी निवडणुकीच्या माध्यमातून जनतेच्या मैदानात उतरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ते पुढे म्हणाले की, प्रत्येक गट व गणात स्थानिक प्रश्नांवर आधारित स्वतंत्र जाहीरनामा तयार केला जाईल. उमेदवार निवडताना जाती–धर्मापेक्षा जनतेत काम करणारे, प्रामाणिक, संघर्षशील आणि प्रश्नांची जाण असलेले कार्यकर्ते प्राधान्याने निवडले जातील. “प्रहारची बॅट हे केवळ निवडणूक चिन्ह नसून अन्यायाविरुद्धचा आवाज, शोषितांचा आधार आणि सर्वसामान्यांच्या हक्कांची लढाई आहे,” असेही त्यांनी ठामपणे सांगितले.
यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर सांगळे यांनी सांगितले की, प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक व नेते बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्ह्यात दिव्यांग, शेतकरी व कष्टकरी वर्गाच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडण्याचे काम करण्यात आले आहे. रस्त्यावर उतरून आंदोलने, मोर्चे, उपोषणे आणि प्रशासकीय पाठपुरावा करून प्रहारने अनेक प्रश्न मार्गी लावले असून, विरोधी पक्षाची उणीव भरून काढण्याचे काम प्रहार जनशक्ती पक्षाने केले असल्याचे त्यांनी नमूद केले.
ज्ञानेश्वर सांगळे पुढे म्हणाले की, आता लोकशाही प्रक्रियेत थेट सहभागी होऊन निर्णय घेणाऱ्या संस्थांमध्ये प्रहारचे प्रतिनिधी पोहोचवणे गरजेचे आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत ताकदीचे आणि जनतेच्या विश्वासार्हतेवर उतरलेले उमेदवार देण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला आहे. निवडून आलेले प्रतिनिधी हे केवळ पदासाठी नव्हे तर जनतेसाठी २४ तास उपलब्ध राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, जिल्हा संपर्कप्रमुख बाळासाहेब खर्जुले यांनी सांगितले की, नेवासा, कोपरगाव, राहता, संगमनेर आणि अकोले या तालुक्यांचा सविस्तर दौरा करण्यात आला आहे. या दौऱ्यात प्रत्येक गट व गणात इच्छुक उमेदवार, स्थानिक कार्यकर्ते, शेतकरी आणि युवकांशी चर्चा करण्यात आली. संघटनाची ताकद, जनतेचा प्रतिसाद आणि स्थानिक प्रश्नांचा अभ्यास करून उमेदवार निश्चित केले जात असून, येत्या काही दिवसांत उमेदवारी अधिकृतरीत्या जाहीर करण्यात येणार आहे.
या बैठकीस प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर सांगळे, युवक जिल्हाप्रमुख पांडुरंग औताडे, जिल्हा संपर्कप्रमुख बाळासाहेब खर्जुले, जिल्हा संघटक जालिंदर आरगडे, शेतकरी विभाग प्रमुख रघुनाथ आरगडे, युवक जिल्हा उपाध्यक्ष संदीप पाखरे व अरविंद आरगडे, संघटक सचिन साबळे व मधुकर शिंदे, तालुकाप्रमुख अनिल विधाटे, युवक तालुकाप्रमुख विकास कोतकर, तालुका उपप्रमुख पांडुरंग नवले तसेच धरणग्रस्त प्रमुख नागनाथ आगळे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
अहिल्यानगर जिल्ह्यात आगामी काळात गट-गणनिहाय दौरे, घराघरात संपर्क अभियान, युवक व शेतकरी संवाद मेळावे, दिव्यांग प्रश्नांवर विशेष बैठका तसेच थेट जनसंवाद उपक्रम राबवून संघटन अधिक मजबूत केले जाणार आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावरची लढाई आणि निवडणुकीतील लढाई एकत्रितपणे लढण्याचा निर्धार प्रहार जनशक्ती पक्षाने यावेळी व्यक्त केला.




