*देवगड गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज यांच्या श्रीमद भागवत कथा सोहळयास शोभायात्रा मिरवणूकीने प्रारंभ*….

देवगड गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज यांच्या श्रीमद भागवत कथा सोहळयास शोभायात्रा मिरवणूकीने प्रारंभ….
*नेवासा – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा*
त्रैवार्षिक पुरुषोत्तम मासानिमित्त नेवासा तालुक्यातील भू लोकीचा स्वर्ग अशी ओळख असलेल्या श्री गुरूदेव दत्त पीठ क्षेत्र देवगड येथे राजस्थान जोधपूर येथील गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज यांच्या श्रीमद भागवत कथा सोहळयाला भागवत ग्रंथ शोभायात्रा मिरवणूकीने व गोमातेच्या पूजनाने प्रारंभ करण्यात आला.
पुरुषोत्तम मासाच्या निमित्ताने आयोजित श्रीमद भागवत कथा व किर्तन सोहळयाला विठ्ठल भक्तीरस महोत्सव असे नाव देण्यात आले आहे.देवगड येथील प्रांगणातून टाळ मृदुंगाच्या गजरात शोभायात्रा मिरवणुकीला प्रारंभ झाला मिरवणुकीत गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज,देवगड दत्त पिठाचे प्रमुख महंत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज,उत्तराधिकारी स्वामी
प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या समवेत वारकरी संप्रदायातील संत महंत कीर्तनकार प्रवचनकार यांच्यासह पुरुष व महिला भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
निघालेल्या यात्रेच्या प्रसंगी गो शाळेतील गोमतेचे तसेच गंगा पात्रात जाऊन गंगेचे पूजन गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज,गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी भगवान दत्तात्रय व श्री समर्थ सदगुरू किसनगिरी बाबांच्या समाधी मंदिरात जाऊन मूर्तींचे पूजन करण्यात आले.कथा सुरू असलेल्या ज्ञानसागर सभामंडपात शोभायात्रा मिरवणूकीचा समारोप करण्यात आला.यावेळी गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज व स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते श्रीमद भागवत ग्रंथाचे पूजन तर श्री राधाकृष्णजी महाराज यांचे संतपूजन तुळशी हार घालून करण्यात आले.
यावेळी बोलतांना गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज म्हणाले की गोवत्स श्री राधाकृष्णजी महाराज हे भागवत कथेच्या माध्यमातून भक्तांना सुख समाधानाचा मार्ग प्राप्त करून देण्याचे काम करत आहे,भागवत कथा ही पूर्व पुण्याईने श्रवण होते या कथेच्या माध्यमातून आपल्याला गोपालकृष्ण भगवंताचे चरित्र ऐकावयास मिळणार असल्याने भक्तांना देखील याचा आनंद मिळणार आहे
जगात कस जगावं हे गीता शिकवते तर कस मरावं हे आपल्याला भागवत शिकवते,जन्म मरणाचे साकडे कथा श्रवणाने सुटते सर्वांनी या पर्व काळातील कथा श्रवणाचा तसेच यामुळे मिळणारा बाहय व आंतरिक आनंद घेण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलतांना केले.भागवत कथा सोहळयाच्या प्रारंभी भाविकांनी कथा श्रवणासाठी मोठी गर्दी केली होती




