Breaking
ई-पेपर

*मुळाची निवडणूक सभासद शेतकऱ्यांनी हातात घेतली : माजी खासदार यशवंतराव गडाख* *सोनईत भर पावसात हजारोंची उपस्थिती; सहकार पॅनलच्या प्रचार सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद*

0 9 0 0 1 7

*मुळाची निवडणूक सभासद शेतकऱ्यांनी हातात घेतली : माजी खासदार यशवंतराव गडाख*
*सोनईत भर पावसात हजारोंची उपस्थिती; सहकार पॅनलच्या प्रचार सभेला उत्स्फूर्त प्रतिसाद*

नेवासा (प्रतिनिधी) – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

 

मुळा सहकारी साखर कारखाना, सोनईच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहकार पॅनलची भव्य प्रचार सभा बुधवारी (दि. २४ जून) सोनई येथे भर पावसात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलचे १८ संचालक बिनविरोध निवडून आले असून, करजगाव गट व महिला मतदारसंघातील जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ या सभेत करण्यात आला.


सभेच्या अध्यक्षस्थानी मुळा कारखान्याचे संस्थापक माजी खासदार यशवंतराव गडाख होते, तर प्रमुख उपस्थिती माजी मंत्री शंकरराव गडाख यांची होती.
यावेळी बोलताना शंकरराव गडाख म्हणाले की, कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व ऊस वेळेत गाळप व्हावा यासाठी कारखान्याची गाळप क्षमता ९ हजार टनांपर्यंत वाढविण्यात आली. तसेच इथेनॉल व सहवीज प्रकल्प उभारून कारखान्याच्या उत्पन्नाचे नवे स्रोत निर्माण करण्यात आले. त्यामुळे उसाला चांगला दर देणे शक्य झाले आहे. कार्यक्षेत्रात कितीही ऊस उपलब्ध झाला तरी कोणत्याही शेतकऱ्याचा ऊस १२ महिन्यांपेक्षा जास्त काळ गळीताविना राहणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
“सर्वसामान्य सभासद, शेतकरी व ऊस उत्पादकांना केंद्रस्थानी ठेवून कारखान्याचा कारभार पारदर्शकपणे चालविला आहे. मिळालेल्या राजकीय पदांचा उपयोग कारखाना व सभासदांच्या हितासाठीच केला. काहीजण केवळ राजकीय फायद्यासाठी कारखान्याबाबत खोटे आरोप करीत आहेत. त्यांना सभासद मतदानातून योग्य उत्तर देतील,” असेही ते म्हणाले.
भर पावसात मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या सभासद, शेतकरी व कार्यकर्त्यांचे आभार मानत त्यांनी बॅट चिन्हासमोरील बटन दाबून सहकार पॅनलच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन केले.
यावेळी अध्यक्षीय भाषणात माजी खासदार यशवंतराव गडाख म्हणाले की, “पन्नास वर्षांपूर्वी शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी मोठ्या कष्टाने मुळा सहकारी साखर कारखान्याची उभारणी केली. त्या काळी नेवासा तालुक्यातील ग्रामस्थ, बंधू-भगिनी आणि सभासदांनी दाखविलेल्या विश्वासामुळेच हा कारखाना उभा राहू शकला. मुळा कारखान्यामुळे तालुक्याच्या अर्थकारणाला मोठी चालना मिळाली.”
ते पुढे म्हणाले की, शंकरराव गडाख यांनी कारखान्याची क्षमता वाढवून विविध प्रकल्प उभारल्यामुळे आज कारखाना शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळप करून त्यांना हक्काचे पैसे देऊ शकतो. जुनी पिढी आणि तरुणांना सोबत घेऊन कारखान्याचा कारभार सक्षमपणे चालविला जात असल्याचा अभिमान वाटतो. शेतकऱ्यांच्या हितासाठी उभ्या केलेल्या या कारखान्याची निवडणूक आता सभासद आणि शेतकऱ्यांनी स्वतःच्या हातात घेतली असून सहकार पॅनलच्या उमेदवारांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
यावेळी मुळाचे चेअरमन नानासाहेब तुवर, ह.भ.प. रामनाथ महाराज पवार, व्हाइस चेअरमन कडूबाळ कर्डिले, शिरेगाव सोसायटीचे चेअरमन डॉ. रमेश प्रल्हाद जाधव, माजी सरपंच रत्नाकर बोर्डे, अश्रूबा सानप आदींनी मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रामनाथ बडे यांनी केले. सभेला विविध संस्थांचे पदाधिकारी, सर्व बिनविरोध संचालक, ज्येष्ठ सभासद, शेतकरी व तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
……………….//……………………………//………………
विरोधी उमेदवाराच्या कुटुंबीयांचा सहकार पॅनलला जाहीर पाठिंबा
माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली मुळा सहकारी साखर कारखाना नेहमीच शेतकरी व सभासद हिताला प्राधान्य देत आला आहे. आगामी निवडणुकीत सहकार पॅनलच्या सर्व उमेदवारांना विक्रमी मतांनी निवडून आणण्याचे आवाहन शिरेगाव सोसायटीचे चेअरमन डॉ. रमेश प्रल्हाद जाधव यांनी केले. त्यांच्या आवाहनाला उपस्थित सभासदांनी टाळ्यांच्या गजरात प्रतिसाद दिला. तसेच शिरेगाव परिसरातून सहकार पॅनलला मोठे मताधिक्य मिळणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

4.5/5 - (2 votes)

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 1 7

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे