Breaking
ई-पेपर

*कुकाणा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाची जागा घाणीच्या विळख्यात; अवैध धंद्यांचा अड्डा, नागरिकांच्या आरोग्याला धोका*

0 8 9 9 1 8

*कुकाणा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विश्रामगृहाची जागा घाणीच्या विळख्यात; अवैध धंद्यांचा अड्डा, नागरिकांच्या आरोग्याला धोका*

नेवासा प्रतिनिधी | कुकाणा (ता. नेवासा)

कुकाणा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) शासकीय विश्रामगृहाच्या जागेची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, संपूर्ण परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे. कचऱ्याचे ढीग, डुकरांचा मुक्त वावर आणि अस्वच्छतेमुळे या ठिकाणी दुर्गंधी पसरत असून नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित विभागाच्या निष्काळजीपणामुळे ही शासकीय जागा आता अवैध धंदे करणाऱ्यांचा अड्डा बनल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे.
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, या ठिकाणी रोज मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असून पावसाचे पाणी साचल्यानंतर संपूर्ण परिसरात असह्य दुर्गंधी पसरते. त्यामुळे डासांची उत्पत्ती वाढून डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया तसेच इतर संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे.
विशेष म्हणजे, या घाणीच्या जागेला लागूनच खाण्यापिण्याचे स्टॉल आणि व्यावसायिक आस्थापने आहेत. त्यामुळे नागरिकांना आणि प्रवाशांना अत्यंत अस्वच्छ वातावरणात खाद्यपदार्थ घ्यावे लागत आहेत. यामुळे अन्नसुरक्षेचाही प्रश्न ऐरणीवर आला असून आरोग्य विभागानेही याची तातडीने दखल घेण्याची गरज आहे.
नागरिकांचे म्हणणे आहे की, शासकीय मालमत्तेची नियमित साफसफाई, सुरक्षा व्यवस्था आणि देखभाल करणे ही सार्वजनिक बांधकाम विभागाची जबाबदारी असताना संबंधित अधिकारी मात्र याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत. परिणामी, लाखो रुपयांच्या शासकीय जागेचे रूपांतर कचराकुंडी आणि अवैध कृत्यांचे केंद्र बनले आहे.
स्थानिक ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामपंचायत, आरोग्य विभाग आणि पोलिस प्रशासनाने संयुक्त कारवाई करून तात्काळ कचरा हटवावा, परिसर स्वच्छ करावा, अवैध धंद्यांवर कारवाई करावी तसेच या जागेभोवती कायमस्वरूपी संरक्षण भिंत व सुरक्षा व्यवस्था उभारावी, अशी मागणी केली आहे.
प्रशासनाने आता तरी जागे व्हावे!
शासन स्वच्छ भारत अभियानावर कोट्यवधी रुपये खर्च करत असताना शासकीय विभागाचीच जागा घाणीच्या विळख्यात अडकलेली दिसणे ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. एखादी साथीची रोगराई पसरल्यानंतर कारवाई करण्यापेक्षा आताच तातडीने स्वच्छता मोहीम राबवून नागरिकांच्या आरोग्याचे संरक्षण करणे आवश्यक आहे. अन्यथा एखादी गंभीर घटना घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासनावर राहील, अशी तीव्र भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

2/5 - (3 votes)

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 1 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे