*गिडेगाव–सुरेगाव–शिरसगाव परिसरात बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद; शेतकऱ्यांनी सोडला सुटकेचा निश्वास*

*गिडेगाव–सुरेगाव–शिरसगाव परिसरात बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद; शेतकऱ्यांनी सोडला सुटकेचा निश्वास*
नेवासा प्रतिनिधी :
गिडेगाव–सुरेगाव–शिरसगाव रोडवरील चंद्रकांत शिवाजी कर्डिले यांच्या शेतात गेल्या काही दिवसांपासून दहशत निर्माण करणारा बिबट्या अखेर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात जेरबंद झाला. काल रात्री बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याचे शनिवारी सकाळी शेतकऱ्यांच्या निदर्शनास आले. बिबट्या जेरबंद झाल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली.
गेल्या काही दिवसांपासून गिडेगाव, सुरेगाव आणि शिरसगाव परिसरात या बिबट्याचा वावर वाढला होता. शेळ्या, कुत्रे, रानडुकरे तसेच अन्य प्राण्यांवर बिबट्याने हल्ले केल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. मात्र बिबट्या नागरिकांच्या सहज नजरेस पडत नसल्याने त्याची दहशत अधिकच वाढली होती. त्यामुळे शेतकरी व शेतमजूर शेतीच्या कामासाठी शेतात जाण्यासही घाबरत होते.
बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे नागरिकांनी वनविभागाकडे पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. त्यानंतर वनविभागाने चंद्रकांत कर्डिले यांच्या शेतात पिंजरा लावला. अखेर रात्रीच्या सुमारास बिबट्या पिंजऱ्यात अडकला. सकाळी पिंजऱ्यात बिबट्या आढळून आल्यानंतर नागरिकांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली.
माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. आवश्यक ती खबरदारी घेत बिबट्याला ताब्यात घेऊन वनविभागाच्या वाहनातून सुरक्षितपणे पुढील कार्यवाहीसाठी रवाना करण्यात आले.
दरम्यान, बिबट्या जेरबंद झाल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरताच गिडेगाव, सुरेगाव, शिरसगाव तसेच आसपासच्या गावांतील शेतकरी व नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. बिबट्या जेरबंद झाल्याने नागरिकांनी काहीसा सुटकेचा निश्वास सोडला असला, तरी परिसरात आणखी बिबट्यांचा वावर असण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
वनविभागाने परिसरात गस्त वाढवून बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवावे तसेच आणखी बिबटे असल्यास त्यांचा शोध घेऊन नागरिकांची भीती दूर करावी, अशी मागणी परिसरातील शेतकरी व नागरिकांनी केली आहे.
यावेळी शेतकऱ्यांनी एस नाईन मीडियाशी संवाद साधताना परिसरातील बिबट्यांच्या वाढत्या वावराबाबत माहिती देत वनविभागाने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली.




