Breaking
ई-पेपरमहाराष्ट्र

*योगीराज गंगागिरी महाराज सप्ताहाच्या सांगतेला मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांची उपस्थिती*

*“येथे भक्तीचा महासागर पाहायला मिळाला” — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

0 8 9 9 8 9

*योगीराज गंगागिरी महाराज सप्ताहाच्या सांगतेला मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांची उपस्थिती*

*“येथे भक्तीचा महासागर पाहायला मिळाला” — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

आ. विठ्ठलराव लंघे पाटील यांनी गुलाबपुष्प देऊन केले स्वागत; रामगिरी महाराजांनी सरकारच्या विकासकामांचे केले कौतुक

अहिल्यानगर (प्रतिनिधी) :

संतपरंपरा, वारकरी संप्रदाय आणि हरिनामाच्या गजराने भक्तिमय झालेल्या श्रीक्षेत्र धनगरवाडी येथे सद्गुरु संत योगीराज गंगागिरी महाराज यांच्या १७९ व्या सप्ताहाची सांगता लाखो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात व भक्तिमय वातावरणात झाली. या सांगता सोहळ्यास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी उपस्थित राहून सद्गुरु ह.भ.प. रामगिरी महाराज यांचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. यावेळी नेवासा मतदारसंघाचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस व उपमुख्यमंत्री शिंदे यांचे गुलाबपुष्प देऊन उत्स्फूर्त स्वागत केले.


शिर्डी विमानतळावर आगमन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीक्षेत्र धनगरवाडी येथे सुरू असलेल्या सप्ताहस्थळी भेट दिली. यावेळी लाखो भाविकांच्या उपस्थितीने परिसर अक्षरशः भक्तीच्या महासागरात न्हाऊन निघाला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सद्गुरु रामगिरी महाराजांचे दर्शन घेतले आणि उपस्थित भाविकांना शुभेच्छा दिल्या. आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी यावेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचे स्वागत करताना नेवासा तालुक्यातील विविध विकासकामे व जनतेच्या प्रश्नांबाबतही चर्चा केली.
“मुंबईत समुद्र पाहिला; येथे भक्तीचा महासागर पाहायला मिळाला”
यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “मुंबईवरून निघाल्यानंतर आम्हाला मोठा समुद्र दिसत होता; मात्र या सप्ताहाच्या ठिकाणी आल्यानंतर भाविकांच्या भक्तिभावाचा समुद्र पाहायला मिळत आहे. ही हरिनामाची, सद्गुरु गंगागिरी महाराजांची आणि सद्गुरु रामगिरी महाराजांची किमया आहे.”
महाराष्ट्राची संस्कृती आणि सभ्यता प्राचीन असून अनेक आक्रमणे झाली, विचार आणि संस्कृती बदलण्याचे प्रयत्न झाले; मात्र भारताची संस्कृती अबाधित राहिली. यामागे वारकरी परंपरा आणि भारतातील गुरुपरंपरेचे मोठे योगदान आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मंदिरे आणि देवालये उद्ध्वस्त झाली, परंतु भारतीयांच्या मनातील श्रद्धा आणि भक्तीचा भाव कोणीही तोडू शकले नाही. वारकरी परंपरेमुळे पांडुरंगाचा गजर आणि हरिनामाचा गजर कधीही थांबला नाही, असेही त्यांनी नमूद केले.


“शेतकरी हा अर्थव्यवस्थेचा कणा”
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकार सातत्याने काम करत असल्याचे सांगत मुख्यमंत्री फडणवीस यांनी शेतकरीहिताच्या विविध निर्णयांचा उल्लेख केला. शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी शासन प्रयत्नशील असून, सध्या दिवसा आठ तास वीज देण्याचे काम सुरू आहे. भविष्यात १२ तास व ३६५ दिवस मोफत वीज देण्याचा सरकारचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले.
कर्जमाफीच्या निर्णयाचा उल्लेख करताना आतापर्यंत साडेबारा लाख शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा झाल्याचे सांगून, ५६ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळवून देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतकरी हा केवळ ग्रामीण भागाचा नव्हे तर संपूर्ण अर्थव्यवस्थेचा कणा आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
“या पवित्र भूमीवर भक्तीचा महासागर लोटला आहे” — उपमुख्यमंत्री शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे म्हणाले की, योगीराज गंगागिरी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीवर भगवंताचा वास असून, त्यामुळेच येथे भक्तीचा महासागर लोटला आहे. गंगागिरी महाराजांनी सुरू केलेली वारकरी संप्रदायाची सप्ताह परंपरा आजही अखंड सुरू आहे. सप्ताहातील नामस्मरणामुळे संपूर्ण परिसरात भक्ती, प्रसन्नता आणि चैतन्य निर्माण होते.


“हा महाराष्ट्र संतांची भूमी आहे. संत-महंतांच्या आशीर्वादाने महाराष्ट्राची वाटचाल सुरू आहे. संतांच्या केसालाही धक्का लागणार नाही,” असे सांगत शिंदे यांनी संतपरंपरेचे महत्त्व अधोरेखित केले.
लाडकी बहीण योजना बंद होणार नसल्याचे स्पष्ट करताना त्यांनी “सरकारी तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा आहे,” असे सांगितले. हे सरकार गोरगरीब, कष्टकरी, शेतकरी आणि सर्वसामान्यांचे असल्याचेही त्यांनी नमूद केले.
सप्ताहातील अन्नदान आणि हरिनामाची परंपरा ही महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारी असल्याचे सांगत, “या ठिकाणी कोणी श्रीमंत नाही, कोणी गरीब नाही; सर्वजण जातीभेद विसरून एकत्र येतात,” असे शिंदे म्हणाले.
“सरला बेटावर विकासकामांचा धडाका” — ह.भ.प. रामगिरी महाराज
यावेळी ह.भ.प. रामगिरी महाराज यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या मंत्रिमंडळाच्या माध्यमातून श्रीक्षेत्र सरला बेटावर अनेक विकासकामे मार्गी लागल्याचे सांगितले. सरला बेटावर सुमारे सात कोटी रुपयांचा सभामंडप, पुलाची कामे, ग्राउंड, सुशोभीकरण यांसह विविध विकासकामे पूर्णत्वास गेल्याचे त्यांनी नमूद केले. गोमातेच्या संरक्षणासाठीही सरकारकडून मोठा हातभार मिळत असल्याचे त्यांनी सांगितले.
धर्मकार्य करताना कोणत्याही धर्माचा विरोध करणे हा उद्देश नसून प्रत्येकाने आपल्या धर्माचा आदर करताना इतर धर्मांचाही आदर केला पाहिजे, असे रामगिरी महाराज यांनी स्पष्ट केले. समाजात अराजकता निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींच्या विरोधात सज्जनांनी आवाज उठवणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
“हा महाराष्ट्र ज्ञानोबा-तुकाराम महाराजांचा आहे. वारकरी संप्रदाय हा सर्वांना सोबत घेऊन चालणारा संप्रदाय आहे. त्यामुळे वारकरी संप्रदायाला कोणीही लांच्छन लावण्याचा प्रयत्न करू नये,” असे रामगिरी महाराज यांनी ठणकावून सांगितले.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच मंत्रिमंडळातील सदस्यांनी वेळात वेळ काढून सप्ताहासाठी उपस्थित राहिल्याबद्दल रामगिरी महाराज यांनी सरकारचे आणि सर्व मान्यवरांचे शब्दसुमनांनी स्वागत करून आभार व्यक्त केले.
लाखो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिमय सांगता
सप्ताहाच्या सांगता सोहळ्यास ह.भ.प. रामगिरी महाराज, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, आमदार बाळासाहेब थोरात, आमदार अमोल खताळ, आमदार आशुतोष काळे, आमदार विवेक कोल्हे, आमदार रमेश बोरणारे, आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, नितीन दिनकर, नितीन औताडे, धनंजय धोरडे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी, अधिकारी, संत-महंत आणि लाखो भाविक उपस्थित होते.
अखेर ‘सोनियाचा दिवस आज’ या अभंगाच्या गजरात १७९ व्या योगीराज गंगागिरी महाराज सप्ताहाची सांगता झाली. हरिनामाचा अखंड गजर, संतवाणी आणि लाखो भाविकांच्या उपस्थितीने श्रीक्षेत्र धनगरवाडीचा परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला, आणि योगीराज गंगागिरी महाराजांच्या सप्ताहाची सांगता अविस्मरणीय ठरली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 8 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे