*अंधश्रद्धेविरोधी विचारांचा वारसा युवकांनी पुढे न्यावा — डॉ. अशोकराव ढगे*

अंधश्रद्धेविरोधी विचारांचा वारसा युवकांनी पुढे न्यावा — डॉ. अशोकराव ढगे
नेवासा प्रतिनिधी :
नेवासा तालुक्यातील प्रवरा संगम येथील श्री सिद्धेश्वर इंग्लिश स्कूलमध्ये थोर समाजसेवक व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या १३व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. मुख्याध्यापक बाबासाहेब गायकवाड यांच्या हस्ते डॉ. दाभोळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. उपस्थितांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहत त्यांच्या विवेकवादी विचारांना अभिवादन केले.
यावेळी कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोकराव ढगे यांनी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याचा आणि विवेकवादी विचारांचा सविस्तर आढावा घेतला. “डॉ. दाभोळकरांनी समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेक आणि प्रश्न विचारण्याची वृत्ती रुजविण्यासाठी आयुष्यभर संघर्ष केला. युवक पिढीने त्यांच्या विचारांचा वारसा स्वीकारून अंधश्रद्धेविरोधातील चळवळीची धुरा पुढे नेली पाहिजे,” असे आवाहन त्यांनी केले.
समाजात भोंदूगिरी, जादूटोणा आणि बुवाबाजीसारख्या अंधश्रद्धेच्या प्रवृत्ती पुन्हा डोके वर काढत असल्याने अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्य अधिक प्रभावीपणे समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचविणे ही काळाची गरज असल्याचेही डॉ. ढगे यांनी नमूद केले.
अंनिसचे जिल्हा कार्यकर्ते बी. के. चव्हाण ‘मामा’ यांनी प्रवरा संगम परिसरात विविध कृती कार्यक्रम व जनजागृती उपक्रम आयोजित करून अंधश्रद्धेविरोधात व्यापक जनजागरण करण्यात येईल, असे सांगितले. त्यांनीही डॉ. दाभोळकरांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
कार्यक्रमास पर्यवेक्षक विनोद सरोदे, महेश दरेकर, बाबासाहेब लाळगे, विजय कडाळे, अध्यापिका प्राजक्ता रासने यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार हायस्कूलचे पर्यवेक्षक विनोद सरोदे यांनी मानले.




