*सौर कृषी पंप योजनेपासून वंचित शेतकऱ्यांना दिलासा द्या; बंद कृषी पंप कोटेशन तातडीने सुरू करा – आ. विठ्ठलराव लंघे यांची अधिवेशनात जोरदार मागणी*
*सौर कृषी पंप योजनेपासून वंचित शेतकऱ्यांना दिलासा द्या; बंद कृषी पंप कोटेशन तातडीने सुरू करा – आ. विठ्ठलराव लंघे यांची अधिवेशनात जोरदार मागणी*
नेवासा! प्रतिनिधी- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
राज्याच्या पावसाळी अधिवेशनात नेवासा मतदारसंघाचे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी शेतकऱ्यांच्या विविध ज्वलंत प्रश्नांवर आवाज उठवत सरकारचे लक्ष वेधले. सौर कृषी पंप योजनेपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याबरोबरच बंद करण्यात आलेले कृषी पंप वीजजोडणीचे कोटेशन तात्काळ सुरू करण्याची मागणी त्यांनी सभागृहात केली.
यावेळी बोलताना आ. लंघे म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेमुळे दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज असलेल्या लाखो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. संकटग्रस्त शेतकऱ्यांना उभारी देण्याचे काम या निर्णयामुळे झाले असले, तरी कर्जमाफी हा शेवटचा उपाय नसून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
शेतमाल उत्पादन खर्च आणि मिळणारा बाजारभाव यामधील वाढती तफावत शेतकऱ्यांना आर्थिक संकटात ढकलत असल्याचे सांगताना त्यांनी सरकारने शेतकऱ्यांचा “सातबारा कोरा करण्यासाठी” ठोस धोरण आखावे, अशी मागणी केली.
आ. लंघे यांनी राज्यातील शेतकऱ्यांवर ओढवलेल्या नैसर्गिक संकटांकडेही सरकारचे लक्ष वेधले. अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, कीड व रोगांचा प्रादुर्भाव यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अनेक वेळा हातातोंडाशी आलेली पिके एका रात्रीत उद्ध्वस्त होत असल्याचे वास्तव मांडताना त्यांनी, “बांधावर जाऊन शेतकऱ्यांचे नुकसान पाहिल्यानंतर मन हेलावून जाते,” अशी भावना व्यक्त केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या भरपाईत वाढ करण्याची मागणीही त्यांनी केली.
वीजपुरवठ्याच्या प्रश्नावर बोलताना आ. लंघे म्हणाले की, कृषी पंपांसाठी मिळणारी आठ तासांची वीज सहा तासांवर आणण्यात आली आहे. मात्र वाढत्या भारामुळे ही सहा तासांची वीजही नियमित आणि पूर्ण क्षमतेने मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
नेवासा तालुक्यातील बॅकवॉटर परिसराचा विशेष उल्लेख करत त्यांनी सांगितले की, या भागातील अनेक शेतकरी सौर कृषी पंप योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. त्यामुळे त्यांना पारंपरिक वीजजोडणीची आवश्यकता आहे. परंतु कृषी पंप कनेक्शनसाठीची कोटेशन प्रक्रिया बंद असल्याने हजारो शेतकरी अडचणीत आले आहेत. बंद करण्यात आलेली कृषी पंप वीजजोडणीची कोटेशन प्रक्रिया तातडीने सुरू करून वंचित शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी ठाम मागणी त्यांनी सभागृहात केली.
शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत आक्रमक भूमिका घेत आ. विठ्ठलराव लंघे यांनी पावसाळी अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधून घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.



