Breaking
ई-पेपर

*शेती क्षेत्रात उच्च तंत्रज्ञानाचा वापर काळाची गरज : डॉ. अशोकराव ढगे*

0 8 9 9 1 8

*शेती क्षेत्रात उच्च तंत्रज्ञानाचा वापर काळाची गरज : डॉ. अशोकराव ढगे*

नेवासा : वाढत्या उत्पादन खर्चावर नियंत्रण मिळवून शेती अधिक कार्यक्षम, आधुनिक आणि उत्पादनक्षम करण्यासाठी उच्च तंत्रज्ञानाचा अवलंब करणे ही काळाची गरज आहे. नॅनो तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या नॅनो डीएपीचा शेतकऱ्यांनी शिफारशीनुसार योग्य पद्धतीने वापर करून खतावरील खर्चात बचत करावी, असे प्रतिपादन माजी कुलगुरू तथा कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोकराव ढगे यांनी केले.

नेवासा फाटा येथील रेणुका माता सभागृहात कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड यांच्या वतीने शेतकऱ्यांसाठी ‘नॅनो डीएपी व उच्च तंत्रज्ञान’ या विषयावर चर्चा व संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती रावसाहेब कांगणे पाटील होते.

या परिसंवादाला परिसरातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. शेतीतील बदलते तंत्रज्ञान, खतांचा कार्यक्षम वापर, उत्पादन खर्च आणि नॅनो डीएपीच्या वापराबाबत शेतकऱ्यांनी विविध प्रश्न उपस्थित केल्याने चर्चासत्राला चांगलीच रंगत आली.

यावेळी विभागीय कृषी विद्यापीठाचे डॉ. विनेश रेगे, माजी कुलगुरू तथा कृषी शास्त्रज्ञ डॉ. अशोकराव ढगे आणि कृषी विज्ञान केंद्र, दहिगावचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. शामसुंदर कौशिक यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

डॉ. अशोकराव ढगे म्हणाले, “कृषी क्षेत्रात तंत्रज्ञानाचा योग्य वापर केल्यास उत्पादन खर्च कमी करून उपलब्ध साधनसामग्रीचा अधिक कार्यक्षम वापर करता येतो. नॅनो तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या नॅनो डीएपीचा शेतकऱ्यांनी योग्य पद्धतीने वापर करून खताच्या खर्चात बचत करावी. आधुनिक शेतीसाठी उच्च तंत्रज्ञानाचा स्वीकार करणे ही आता काळाची गरज आहे.”

नॅनो डीएपीच्या वापराबाबत मार्गदर्शन करताना डॉ. विनेश रेगे यांनी नॅनो डीएपी हे द्रवरूप खत असून त्याचा वापर फवारणीद्वारे करता येतो, असे स्पष्ट केले. त्यातील कण अतिसूक्ष्म असल्याने ते पिकांच्या पानांद्वारे शोषले जातात. त्यामुळे खताचा कार्यक्षम वापर होऊन नासाडी कमी करण्यास मदत होते. मात्र, पिकाची अवस्था, गरज आणि शिफारशीनुसार त्याचा वापर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

डॉ. शामसुंदर कौशिक यांनी पिकांना खत देताना पिकाची अवस्था, संवेदनशीलता आणि गरज लक्षात घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगितले. रासायनिक खतांवर शासन मोठ्या प्रमाणात अनुदान देत असल्याने उपलब्ध खतांचा काटेकोर आणि योग्य वापर होणे गरजेचे आहे. यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होण्याबरोबरच राष्ट्रीय पातळीवरही मोठी बचत होऊ शकते, असे त्यांनी नमूद केले.

उच्च तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये आधुनिक शेतीबाबत जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेडने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे डॉ. अशोकराव ढगे यांनी कौतुक करत आयोजकांचे अभिनंदन केले.

अध्यक्षीय भाषणात रावसाहेब कांगणे पाटील यांनी नॅनो डीएपीच्या वापराचे शेतकऱ्यांच्या शेतावर चांगले परिणाम दिसून आल्याचे सांगत आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमास कोरोमंडलचे सहाय्यक व्यवस्थापक उदय चौधरी, व्यवसाय व्यवस्थापक किरण गिरी यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चर्चासत्रात प्रश्न विचारून सक्रिय सहभाग नोंदविणाऱ्या शेतकऱ्यांचा भरीव बक्षिसे देऊन सन्मान करण्यात आला. कृषीविद्यावेत्ता प्रणव जाधव यांनी कार्यक्रमाचे उत्कृष्ट नियोजन केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 1 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे