*देशाच्या भविष्यावर लाठ्या-काठ्यांचा मारा! संसद मार्चदरम्यान विद्यार्थ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र*

*देशाच्या भविष्यावर लाठ्या-काठ्यांचा मारा!
संसद मार्चदरम्यान विद्यार्थ्यांवर पोलिसांचा लाठीचार्ज; धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याची मागणी तीव्र*
नवी दिल्ली | महाराष्ट्र 7 न्यूज प्रतिनिधी
देशातील शिक्षण व्यवस्थेतील कथित गैरव्यवहारांविरोधात आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉक्रोच जनता पार्टी (CJP)च्या नेतृत्वाखाली आज दिल्लीत संसदेकडे काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान मोठा तणाव निर्माण झाला. जंतर-मंतरवरून संसदेकडे निघालेल्या आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज व अन्य जमावनियंत्रणाची कारवाई केली. आंदोलकांनी मात्र मागे हटण्यास स्पष्ट नकार देत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.
दरम्यान, कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांनी आपले बेमुदत उपोषण मागे घेतले आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी रुग्णालयातून केलेल्या विनंतीनंतर दिपके यांनी हा निर्णय घेतला. मात्र, उपोषण मागे घेतले असले तरी आंदोलन सुरूच राहणार असल्याचे CJP ने स्पष्ट केले आहे.
आंदोलकांचा आरोप आहे की, शांततेच्या मार्गाने संसदेकडे जात असताना त्यांच्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. अनेक विद्यार्थी आणि युवकांनी पोलिस कारवाईचा निषेध करत “कितीही मारलं, कितीही दडपलं तरी आंदोलन थांबणार नाही” अशी आक्रमक भूमिका घेतली.
या आंदोलनामुळे राजधानी दिल्लीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून संसद परिसरात सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. आंदोलनामुळे देशभरातील विद्यार्थी संघटना आणि विविध सामाजिक संघटनांचे लक्ष या घडामोडीकडे लागले आहे.




