गुरुपौर्णिमेनिमित्त अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेकडून देवसडे प्राथमिक शाळेतील गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा गौरव*

*गुरुपौर्णिमेनिमित्त अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेकडून देवसडे प्राथमिक शाळेतील गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचा गौरव*
नेवासा (प्रतिनिधी): महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, नेवासा तालुक्याच्या वतीने देवसडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा, केंद्रप्रमुख व शिक्षकांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांना सन्मानपत्रांचे वितरण करून त्यांच्या यशाचे कौतुक करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुदर्शन घोडेचोर होते. प्रमुख उपस्थितीत अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अहिल्यानगर जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ कचरे, नेवासा तालुका अध्यक्ष पत्रकार नामदेव शिंदे, शिक्षण विभागाचे कुकाणा केंद्रप्रमुख सतीश भोसले, सामाजिक कार्यकर्ते असिफ सय्यद, युवा उद्योजक सोमनाथ वाबळे, उपसरपंच सचिन घोडेचोर, सोसायटीचे चेअरमन अभिजित उगले, शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सिद्धार्थ दळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना सोमनाथ कचरे म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या जीवनात शिक्षकांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. शिक्षक केवळ ज्ञानदान करत नाहीत, तर विद्यार्थ्यांवर संस्कार घडवून त्यांना आदर्श नागरिक बनविण्याचे पवित्र कार्य करतात. गुणवंत विद्यार्थी घडविण्यामागे शिक्षकांची मेहनत आणि पालकांचे सहकार्य तितकेच महत्त्वाचे असते. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने या ज्ञानदीपांचा सन्मान करण्याची संधी मराठी पत्रकार परिषदेला मिळाल्याचा आनंद आहे.” यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षण, वाचन, शिस्त आणि ध्येय निश्चितीचे महत्त्वही पटवून दिले.
शिक्षण विभागाचे कर्तव्यदक्ष केंद्रप्रमुख सतीश भोसले यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की, “विद्यार्थी, पालक आणि शिक्षक हे शिक्षण व्यवस्थेचे तीन महत्त्वाचे घटक आहेत. या तिन्ही घटकांचा सक्रिय सहभाग असेल तरच विद्यार्थी गुणवंत होऊन समाजासाठी आदर्श नागरिक म्हणून घडू शकतात.”

नेवासा तालुका अध्यक्ष नामदेव शिंदे यांनी उपस्थित विद्यार्थी, शिक्षक व पालकांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देत परिषदेच्या वतीने सर्व मान्यवरांचे स्वागत व सत्कार केला.
कार्यक्रमास अमित उगले आप्पासाहेब पिसोटे, आदिनाथ तेलोरे, दावीद मिसाळ यांच्यासह शिक्षक, पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक वसंत तांबे यांनी केले, तर भारत कोठुळे यांनी उपस्थितांचे आभार मानले.





