*लेकीच्या हातात न्यायाचे तराजू! नेवाशातील वृत्तपत्र विक्रेत्याच्या कन्येची वकीलपदापर्यंतची प्रेरणादायी झेप*

लेकीच्या हातात न्यायाचे तराजू! नेवाशातील वृत्तपत्र विक्रेत्याच्या कन्येची वकीलपदापर्यंतची प्रेरणादायी झेप
नेवासा | प्रतिनिधी – महाराष्ट्र 7 न्यूज वृत्तसेवा
संघर्षाला जिद्दीची जोड आणि कष्टांना शिक्षणाची साथ मिळाली तर यशाला कोणतीही सीमा राहत नाही, याचे जिवंत उदाहरण नेवासे तालुक्यातील भानसहिवरे येथील अस्मिता अशोकराव पेहरकर हिने घालून दिले आहे. वृत्तपत्र विक्रेते अशोकराव पेहरकर आणि शेतमजूर रंजना पेहरकर यांच्या कन्येने प्रतिकूल आर्थिक परिस्थितीवर मात करत छत्रपती संभाजीनगर येथील माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयातून बी.ए. एलएल.बी. पदवी प्रथम श्रेणीत संपादन केली असून, वकील होण्याचा मान मिळवला आहे.
रोज पहाटे लोकांपर्यंत वर्तमानपत्रे पोहोचविण्यासाठी कष्ट करणाऱ्या वडिलांच्या मेहनतीला आणि शेतमजुरी करून संसाराचा गाडा ओढणाऱ्या आईच्या त्यागाला अस्मिताने आपल्या यशाने सुवर्णमुकुट चढवला आहे. तिच्या या यशाने केवळ पेहरकर कुटुंबाचाच नव्हे, तर संपूर्ण नेवासा तालुक्याचा अभिमान उंचावला आहे.
पेहरकर कुटुंबाने मुलींना शिक्षणाची समान संधी दिली आणि त्याचे फळ आज समाजासमोर प्रेरणादायी उदाहरण म्हणून उभे आहे. या कुटुंबातील अस्मिताच्या दोन्ही बहिणी यापूर्वीच डॉक्टर झाल्या असून, आता अस्मिताने वकील बनत कुटुंबाच्या शैक्षणिक आणि सामाजिक यशात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे. मुलींना योग्य संधी, प्रोत्साहन आणि शिक्षण मिळाले तर त्या कोणतेही शिखर गाठू शकतात, याची ही प्रेरणादायी साक्ष आहे.
आपल्या यशाबद्दल भावना व्यक्त करताना अस्मिता म्हणाली, “गरीब, गरजू आणि वंचित नागरिकांना योग्य कायदेशीर न्याय मिळवून देणे, हेच माझ्या वकिली व्यवसायाचे ध्येय आहे.” तिच्या या सामाजिक जाणीवेच्या भूमिकेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
या यशस्वी प्रवासाने संघर्ष, पालकांचा त्याग, शिक्षणाची ताकद आणि मुलींच्या कर्तृत्वाचा प्रेरणादायी संदेश समाजासमोर ठेवला आहे. अस्मिताच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.




