*मोरयाचिंचोरे येथे ३ ते १० सप्टेंबरदरम्यान अखंड हरिनाम सप्ताह*
*सद्गुरू भाऊराव बाबा पोटे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन*

*मोरयाचिंचोरे येथे ३ ते १० सप्टेंबरदरम्यान अखंड हरिनाम सप्ताह*
*सद्गुरू भाऊराव बाबा पोटे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन*
नेवासा | प्रतिनिधी-
श्री क्षेत्र मोरयाचिंचोरे, ता. नेवासा येथे वै. प. पू. सद्गुरू श्री भाऊराव बाबा पोटे महाराज यांच्या १३व्या पुण्यतिथीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा धार्मिक सोहळा ३ ते १० सप्टेंबर २०२६ या कालावधीत विविध भक्तिमय कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.

वेदांत केसरी ब्र. श्री. रंगनाथ महाराज परभणीकर (गुरुजी) यांचे एकनिष्ठ शिष्य असलेल्या सद्गुरू भाऊराव बाबा पोटे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित या सप्ताहात काकडा भजन, रामकृष्ण हरी नामजप, प्रवचन, विष्णुसहस्रनाम, ज्ञानेश्वरी पारायण, हरिकीर्तन तसेच रात्री जागर आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
३ सप्टेंबर रोजी सप्ताहाचा शुभारंभ होणार असून सकाळी काकडा भजन, रामकृष्ण हरी नामजप व प्रवचन होईल. ह.भ.प. विष्णू महाराज पिठोरे यांचे सद्गुरू वै. भाऊराव बाबा पोटे महाराज यांच्या जीवनचरित्रावर प्रवचन होणार आहे. त्यानंतर विष्णुसहस्रनाम व ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरी पारायणास सुरुवात होईल. रात्री हरिकीर्तन व जागराचा कार्यक्रम होणार आहे.
सप्ताहादरम्यान विविध दिवशी ह.भ.प. वेदांताचार्य हरिभाऊ महाराज भोंडे, ह.भ.प. भागवताचार्य सुदाम महाराज पालवे, ह.भ.प. रामायाणाचार्य लक्ष्मण महाराज कदम, ह.भ.प. वेदांताचार्य गणेश महाराज पाटील, ह.भ.प. डॉ. हरिदास महाराज पालवे (शिवाजी), ह.भ.प. नवनाथ कथाकार गणेश महाराज कुळकर्णी तसेच ह.भ.प. धर्माचार्य मारुती महाराज तुतुने शास्त्री आदी संत-महंतांचे मार्गदर्शन लाभणार आहे.
५ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता दिंडी व नगरप्रदक्षिणा आयोजित करण्यात आली आहे. तसेच ९ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजता पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त सद्गुरू भाऊराव बाबा पोटे महाराज यांच्या समाधीस अभिषेक व मंत्रपुष्पांजली अर्पण करण्यात येणार आहे.
१० सप्टेंबर रोजी सप्ताहाची सांगता होणार असून या दिवशी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच ४ सप्टेंबर रोजी गोकुळाष्टमीनिमित्त रात्री १० ते १२ या वेळेत भजनी मंडळाचा विशेष भजन कार्यक्रम होणार आहे.
या अखंड हरिनाम सप्ताहाचा व पुण्यतिथी सोहळ्याचा पंचक्रोशीतील भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन मोरयाचिंचोरे येथील ग्रामस्थ, भजनी मंडळे व आयोजक मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
स्थळ : वै. प. पू. सद्गुरू श्री भाऊराव बाबा पोटे महाराज समाधी स्थळ, श्री क्षेत्र मोरयाचिंचोरे, ता. नेवासा.



