‘राम’ नामाने कीर्तनाची सुरुवात आणि शेवट : ह.भ.प. अक्षय महाराज उगले
*आई-वडिलांना जिवंतपणी समाधानी ठेवा; तरुणांनी व्यसनांपासून दूर राहावे*

‘राम’ नामाने कीर्तनाची सुरुवात आणि शेवट : ह.भ.प. अक्षय महाराज उगले
आई-वडिलांना जिवंतपणी समाधानी ठेवा; तरुणांनी व्यसनांपासून दूर राहावे
नेवासा तालुका प्रतिनिधी :
कुकाणा येथे सुरू असलेल्या सप्ताहाच्या निमित्ताने तिसऱ्या दिवशी कीर्तन सेवा करताना ह.भ.प. अक्षय महाराज उगले यांनी आई-वडिलांचे महत्त्व, संस्कार आणि व्यसनमुक्तीचा संदेश प्रभावीपणे मांडला. ‘राम’ नामाने कीर्तनाची सुरुवात होते आणि ‘राम’ नामानेच त्याचा शेवट व्हावा, या भावनेतून त्यांनी उपस्थित भाविकांना नामस्मरणासोबतच चांगले आचरण करण्याचा संदेश दिला.
जगातील खरे सुख देणारे कोणी असतील तर ते आपले आई-वडील आहेत. आई-वडिलांइतके निस्वार्थ प्रेम जगात अन्य कोणीही करू शकत नाही. मुलांच्या सुखासाठी वडील आयुष्यभर कष्ट करतात, प्रसंगी मुलांसाठी इतरांच्या पाया पडायलाही ते मागेपुढे पाहत नाहीत. त्यामुळे आई-वडिलांना त्यांच्या हयातीतच प्रेम, सन्मान आणि समाधान द्या, असे भावनिक आवाहन ह.भ.प. अक्षय महाराज उगले यांनी केले.
आई-वडिलांसोबत दोन घास प्रेमाने जेवण्यामध्येही मोठे समाधान आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहणे हीच मुलांसाठी खरी कमाई आहे. आई-वडिलांचे महत्त्व त्यांच्या जाण्यानंतर समजण्यापेक्षा ते जिवंत असतानाच त्यांची सेवा आणि काळजी घेणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
‘राग, द्वेष आणि अहंकारासाठी हा नरदेह नाही’ असे सांगत महाराजांनी मानवी जीवनाचे खरे उद्दिष्ट समजून घेण्याचे आवाहन केले. मनात राग-द्वेष ठेवून किंवा अहंकाराला कवटाळून जीवन व्यर्थ घालवण्यापेक्षा प्रेम, माणुसकी, परोपकार आणि सद्विचारांनी जीवन समृद्ध करावे. प्रत्येकाने दुसऱ्याचा द्वेष करण्याऐवजी आपले आचरण शुद्ध ठेवून समाजात प्रेम आणि बंधुभाव वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत, असा संदेश त्यांनी दिला.
दरम्यान, तरुण पिढीला व्यसनांपासून दूर ठेवण्यासाठी आपण सातत्याने कीर्तनाच्या माध्यमातून जनजागृती करत असल्याचे अक्षय महाराज उगले यांनी सांगितले. व्यसनमुक्तीसाठी पाच हजार मुलांचा समूह तयार केला असून, येणारी पिढी संस्कारी आणि व्यसनमुक्त व्हावी, तरुणांनी आपल्या आयुष्याला योग्य दिशा द्यावी, यासाठी आपण आवर्जून कीर्तन सेवा करीत असल्याचे त्यांनी नमूद केले.
संतविचार, नामस्मरण, आई-वडिलांचा सन्मान, अहंकाराचा त्याग आणि व्यसनमुक्तीचा संदेश देणाऱ्या या कीर्तन सेवेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि ‘राम कृष्ण हरी’च्या जयघोषाने कुकाणा परिसर भक्तिमय झाला.




