Breaking
ई-पेपर

‘*मृत्यूचा सापळा’ बनलेला शेवगाव-नेवासा राज्य मार्ग; खड्ड्यांच्या साम्राज्याने वाहनचालक हैराण, जनआंदोलनाचा इशारा*

0 8 9 9 5 9

‘*मृत्यूचा सापळा’ बनलेला शेवगाव-नेवासा राज्य मार्ग; खड्ड्यांच्या साम्राज्याने वाहनचालक हैराण, जनआंदोलनाचा इशारा*

नेवासा /शेवगाव | प्रतिनिधी- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा

शेवगाव-नेवासा हा मराठवाड्याला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा राज्य मार्ग सध्या अक्षरशः ‘मृत्यूचा सापळा’ ठरला आहे. रस्त्यावरील प्रचंड खड्ड्यांमुळे दररोज अपघात घडत असून वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. प्रशासनाच्या सातत्याने होत असलेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

पावसाळा सुरू होताच या मार्गावरील डांबरीकरण उखडून निघाले असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी या खड्ड्यांमध्ये साचत असल्याने त्यांचा अंदाज येत नाही. परिणामी दुचाकीस्वार घसरून जखमी होण्याच्या घटना वाढल्या असून मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरवर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पावसाळ्यापूर्वी केवळ तात्पुरती डागडुजी केली जाते. मात्र पहिल्याच पावसात ती वाहून जात असल्याने लाखो रुपयांचा खर्च पाण्यात जातो आणि काही दिवसांतच रस्त्याची अवस्था पुन्हा पूर्ववत होते. त्यामुळे ही डागडुजी केवळ कागदोपत्री असल्याची टीका नागरिकांकडून केली जात आहे.

शेवगाव-नेवासा हा मराठवाड्याशी जोडणारा प्रमुख दळणवळणाचा मार्ग असल्याने दिवसभर अवजड व हलक्या वाहनांची मोठी वर्दळ असते. ज्ञानेश्वर, वृद्धेश्वर, केदारेश्वर आणि गंगामाई साखर कारखान्यांच्या ऊस वाहतुकीचाही मोठा भार याच मार्गावर पडतो. मात्र वाहतुकीच्या वाढत्या ताणानुसार रस्त्याचे कायमस्वरूपी मजबुतीकरण न झाल्याने त्याची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत आहे.

खड्ड्यांमुळे वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून रुग्णवाहिका, एसटी बस, शालेय बस आणि इतर अत्यावश्यक सेवांच्या वाहनांनाही या मार्गावरून जाताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास वेळखाऊ आणि धोकादायक बनला आहे.

या मार्गाची केवळ तात्पुरती डागडुजी न करता संपूर्ण रस्त्याचे कायमस्वरूपी मजबुतीकरण करून दर्जेदार डांबरीकरण करण्यात यावे, अशी जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे.

दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते शेषराव आपशेटे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने या गंभीर समस्येची तातडीने दखल घेऊन शेवगाव-नेवासा राज्य मार्गावरील खड्डे कायमस्वरूपी बुजवावेत आणि संपूर्ण रस्त्याचे गुणवत्तापूर्ण काम हाती घ्यावे, अन्यथा नागरिकांच्या सहभागातून तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

“नागरिकांच्या जीवाशी सुरू असलेला हा खेळ आता थांबवावा. एखादा मोठा अपघात झाल्यानंतर जागे होण्यापेक्षा प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात,” अशी संतप्त प्रतिक्रिया वाहनचालक आणि नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 5 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे