Breaking
ई-पेपर

*लोकनेते मारुतरावजी घुले पाटील हे परमार्थप्रेमी, शिक्षणप्रेमी आणि आदर्श राजकारणी होते – ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली कदम महाराज.*

0 8 9 9 1 8

*लोकनेते मारुतरावजी घुले पाटील हे परमार्थप्रेमी, शिक्षणप्रेमी आणि आदर्श राजकारणी होते – ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली कदम महाराज.*

*२४व्या पुण्यस्मरणानिमित्त भेंडा येथे कीर्तनातून लोकनेत्यांच्या कार्याला भावपूर्ण अभिवादन; समाजसेवा, शिक्षण आणि विकासाच्या कार्याचा गौरव*

नेवासा | प्रतिनिधी-

*”घुले पाटील या नावाच्या ब्रह्मगिरीतून नेवासा-शेवगाव तालुक्यासह संपूर्ण नगर जिल्ह्यात विकासाची गंगा अवतरली. त्यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वामुळे शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्य समाज आर्थिक, शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या सक्षम झाला. लोकनेते मारुतरावजी घुले पाटील हे परमार्थप्रेमी, शिक्षणप्रेमी, कुशल संघटक, आदर्श पिता आणि जनतेच्या हितासाठी आयुष्य समर्पित करणारे आदर्श राजकारणी होते,” असे गौरवोद्गार श्रीक्षेत्र आळंदी येथील ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली कदम महाराज यांनी काढले.
लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाचे संस्थापक लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांच्या २४व्या पुण्यस्मरणानिमित्त बुधवार, दि. ८ जुलै रोजी सकाळी भेंडा येथील श्री संत नागेबाबा भक्तनिवास येथे आयोजित कीर्तन सोहळ्यात ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली कदम महाराज, ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे अध्यक्ष तथा माजी आमदार नरेंद्र घुले पाटील, माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, माजी आमदार पांडुरंग अभंग, उपाध्यक्ष काकासाहेब नरवडे, ॲड. देसाई देशमुख, डॉ. क्षितिज घुले पाटील, राज्य साखर कामगार फेडरेशनचे सरचिटणीस नितीन पवार यांच्यासह मान्यवरांनी कारखाना कार्यस्थळावरील स्मृतिस्थळी पुष्पचक्र अर्पण करून लोकनेत्यांना भावपूर्ण अभिवादन केले.
कीर्तनात मार्गदर्शन करताना कदम महाराज म्हणाले, “पंढरीच्या विठ्ठलाची वारी करणे आणि वारकरी होणे, ही जीवनातील सर्वात मोठी कमाई आहे. पायी चालल्याशिवाय वारी घडत नाही. लोकनेते मारुतराव घुले पाटील यांनी साखर कारखान्याला संत ज्ञानेश्वर माऊलींचे नाव देत कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर माऊलींचे मंदिर उभारले. कारखान्यात अल्कोहोल निर्मिती झाली; मात्र दारू निर्मितीला त्यांनी कधीही परवानगी दिली नाही. त्यांच्या या भूमिकेतून त्यांचा परमार्थ, संस्कार आणि संतपरंपरेप्रती असलेली निष्ठा अधोरेखित होते.”
ते पुढे म्हणाले, “ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या मुला-मुलींना उच्च शिक्षणाची संधी मिळावी म्हणून त्यांनी शिक्षणसंस्था उभारून ज्ञानाची दालने खुली केली. त्यामुळे ते या परिसराचे कर्मवीर भाऊराव पाटीलच होते. जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील अनेक पुरस्कारांनी त्यांच्या कार्याचा गौरव झाला. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देऊन नेतृत्व घडविण्याचे मोठे कार्य त्यांनी केले. घुले पाटील परिवार हा समाजसेवा आणि परमार्थाची परंपरा जपणारा परिवार असून, त्यांच्या विचारांचा आणि विकासाचा वारसा नरेंद्र घुले पाटील व चंद्रशेखर घुले पाटील ही ‘राम-लक्ष्मण’ जोडी समर्थपणे पुढे नेत आहे.”
यावेळी श्रीक्षेत्र देवगड संस्थानचे उत्तराधिकारी प्रकाशानंदगिरीजी महाराज, श्रीसद्गुरू नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख उद्धव महाराज मंडलिक, संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे विश्वस्त देविदास महाराज म्हस्के, राम महाराज झिंजूर्के, रामनाथ महाराज काळेगावकर, रमेशानंदगिरी महाराज, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे, ज्ञानेश्वर कारखान्याचे संचालक ॲड. हिम्मतसिंह देशमुख, नेवासा पंचायत समितीचे माजी सभापती राऊसाहेब कांगुणे, मुळा साखर कारखान्याचे अध्यक्ष भाऊसाहेब मोटे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, सभासद, उस उत्पादक शेतकरी, कारखान्याचे अधिकारी, कर्मचारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांच्या कार्याचा गौरव, संतपरंपरेचा जागर आणि समाजहिताचा संदेश यांचा सुंदर संगम घडविणारा हा पुण्यस्मरण सोहळा अत्यंत श्रद्धामय, प्रेरणादायी आणि भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 1 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे