Breaking
ई-पेपरब्रेकिंगराजकिय

‘*गडाख कुटुंबीय राजकीय विरोधक, कौटुंबिक विरोधक नाहीत’; सुजय विखेंच्या स्पष्टीकरणाने चर्चांना पूर्णविराम?*

0 8 9 9 1 8

‘*गडाख कुटुंबीय राजकीय विरोधक, कौटुंबिक विरोधक नाहीत’; सुजय विखेंच्या स्पष्टीकरणाने चर्चांना पूर्णविराम?*

अहिल्यानगर प्रतिनिधी –

माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या भेटीवरून दिवसभर सोशल मीडियावर सुरू असलेल्या राजकीय चर्चांना माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्पष्टीकरण देत पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. “गडाख साहेब हे जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते आहेत. गडाख कुटुंबीय माझे राजकीय विरोधक आहेत; मात्र कौटुंबिक विरोधक नाहीत,” असे स्पष्ट करत त्यांनी या भेटीमागे कोणताही राजकीय हेतू नसल्याचे सांगितले.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉ. सुजय विखे पाटील यांनी माजी खासदार यशवंतराव गडाख यांची त्यांच्या अहिल्यानगर येथील विरंगुळा बंगल्यावर भेट घेतली. या भेटीचा फोटो माध्यमांमध्ये प्रसारित झाल्यानंतर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात दिवसभर विविध तर्क-वितर्कांना उधाण आले होते. आगामी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीकडे विशेष राजकीय अर्थाने पाहिले जात होते.
मात्र, माध्यमांशी संवाद साधताना डॉ. सुजय विखे पाटील यांनी भेटीमागील कौटुंबिक नाते स्पष्ट केले. “गडाख कुटुंबीय माझे राजकीय विरोधक आहेत, कौटुंबिक विरोधक नाहीत. आमचे नातेसंबंध जवळचे आहेत. त्यामुळे यशवंतराव गडाख साहेबांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्यांची भेट घेतली,” असे त्यांनी सांगितले.
आपल्या आणि गडाख कुटुंबीयांच्या कौटुंबिक संबंधांचा संदर्भ देताना त्यांनी माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्याशी असलेल्या नातेसंबंधाचाही उल्लेख केला. शंकरराव गडाख यांचा सख्खा भाचा हा आपला सख्खा साडू असल्याचे सांगत गडाख कुटुंबीयांशी आपले कौटुंबिक संबंध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राजकीय भेट की कौटुंबिक आपुलकी?
विखे–गडाख कुटुंबीयांमध्ये अनेक वर्षांपासून राजकीय संघर्षाचे वातावरण राहिले आहे. विधानसभा निवडणुकीच्या काळातही या संघर्षाला मोठी धार आली होती. त्यामुळे या दोन राजकीय कुटुंबांतील प्रमुख व्यक्तींची एकत्रित भेट झाल्यानंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण येणे स्वाभाविक होते.
विशेषतः जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक जवळ आलेली असताना ही भेट झाल्याने आगामी राजकीय समीकरणांशी तिचा संबंध जोडला जात होता. मात्र, डॉ. सुजय विखे पाटील यांनी स्वतः माध्यमांसमोर भूमिका स्पष्ट केल्याने या भेटीचा राजकीय अर्थ काढण्यापेक्षा कौटुंबिक नात्याच्या संदर्भातच पाहावे, असा संदेश दिला आहे.
‘राजकीय विरोधक, पण कौटुंबिक विरोधक नाहीत’
राजकारणातील विरोध आणि वैयक्तिक अथवा कौटुंबिक संबंध यामध्ये फरक असतो, हे सुजय विखे पाटील यांच्या वक्तव्याने अधोरेखित झाले आहे. राजकीय मतभेद असले तरी ज्येष्ठ नेत्यांची विचारपूस करणे, त्यांच्या प्रकृतीची चौकशी करणे आणि कौटुंबिक नातेसंबंध जपणे याला राजकीय रंग देऊ नये, अशीच भूमिका त्यांच्या स्पष्टीकरणातून पुढे आली आहे.
दरम्यान, या भेटीमुळे दिवसभर सोशल मीडियावर रंगलेल्या चर्चांना आता कितपत विराम मिळतो आणि आगामी काळात नेवासा व जिल्ह्याच्या राजकारणात प्रत्यक्षात कोणती समीकरणे आकार घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
भेटीचे कारण सुजय विखेंनी स्पष्ट केले असले, तरी विखे–गडाख राजकीय संघर्षाची पार्श्वभूमी आणि आगामी सहकार निवडणुका पाहता या भेटीकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष राहणार, हे मात्र निश्चित आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 1 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे