*श्रीक्षेत्र भीमाशंकर देवस्थान भिवधानोरा येथून ११ जुलै रोजी आषाढी पायी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान*
*भाविक व वारकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे दिंडी समितीचे आवाहन*

*श्रीक्षेत्र भीमाशंकर देवस्थान भिवधानोरा येथून ११ जुलै रोजी आषाढी पायी दिंडीचे पंढरपूरकडे प्रस्थान*
*भाविक व वारकऱ्यांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे दिंडी समितीचे आवाहन*
भिवधानोरा | प्रतिनिधी-
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त श्रीक्षेत्र भीमाशंकर देवस्थान, भिवधानोरा येथून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे जाणाऱ्या पारंपरिक पायी दिंडी सोहळ्याचे प्रस्थान शनिवार, दि. ११ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ८ वाजता होणार आहे. या दिंडी सोहळ्याच्या निमित्ताने परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून, भिवधानोरा व परिसरातील जास्तीत जास्त वारकरी, भाविक आणि युवकांनी दिंडीत सहभागी होऊन सोहळ्याची शोभा वाढवावी, असे आवाहन दिंडीचे सदस्य भगवान गुरु यांनी केले.

हा १५ दिवसीय आषाढी पायी वारी दिंडी सोहळा वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार भक्ती, नामस्मरण आणि आध्यात्मिक साधनेने परिपूर्ण असणार आहे. दिंडीमध्ये दररोज पहाटे काकडा भजन, ज्ञानेश्वरी गाथेतील अभंग, गवळणी, हरिपाठ तसेच विविध भक्तिमय कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दिंडीचे चालक ह.भ.प. श्री श्री १००८ महामंडलेश्वर श्रीकृष्णानंद गिरीजी महाराज नागे यांच्या मार्गदर्शनाखाली हा संपूर्ण सोहळा पार पडणार असून, दररोज दुपारी महाराजांचे आध्यात्मिक प्रवचन आणि सायंकाळी सात ते आठ या वेळेत कीर्तन सेवेचा लाभ वारकरी व भाविकांना मिळणार आहे. या माध्यमातून भक्ती, संस्कार आणि वारकरी परंपरेचा जागर करण्यात येणार आहे.
श्री भीमाशंकर संस्थान आषाढी पायी वारी दिंडी सोहळा समितीच्या वतीने सर्व भाविक, वारकरी आणि ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन विठ्ठल नामाच्या अखंड गजरात पंढरीची वारी यशस्वी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी दिंडी समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब उत्तम चव्हाण, उपाध्यक्ष जनार्दन बाबुराव चव्हाण, सचिव रामकिसन शंकरराव चव्हाण, सदस्य दादासाहेब भिवा चव्हाण, रायभान लांडे, अंकुश चव्हाण, शेषराव चव्हाण, मोहन चव्हाण, ज्ञानेश्वर चव्हाण, गोरख चव्हाण, अनिल नागे, सखाराम चव्हाण यांच्यासह दिंडी समितीचे पदाधिकारी, समस्त ग्रामस्थ, वारकरी आणि भजनी मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“ज्ञानोबा-तुकाराम”च्या अखंड जयघोषात आणि “विठ्ठल विठ्ठल” नामस्मरणाच्या मंगल वातावरणात भिवधानोरा येथून पंढरीकडे निघणारा हा दिंडी सोहळा परिसरातील वारकरी परंपरेचे श्रद्धा, भक्ती आणि एकात्मतेचे प्रेरणादायी दर्शन घडविणारा ठरणार आहे.





