*इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत गळनिंब शाळेची दैदिप्यमान कामगिरी*
*सलग तिसऱ्या वर्षी उज्ज्वल निकालाची परंपरा कायम; ३० विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र*

*इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत गळनिंब शाळेची दैदिप्यमान कामगिरी*
*सलग तिसऱ्या वर्षी उज्ज्वल निकालाची परंपरा कायम; ३० विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र*
नेवासा – महाराष्ट्र 7न्यूज नेटवर्क
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी व सातवी शिष्यवृत्ती परीक्षा २०२६ चा निकाल नुकताच जाहीर झाला असून, नेवासा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गळनिंबने यंदाही उल्लेखनीय यश संपादन करत सलग तिसऱ्या वर्षी उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली आहे.
यंदाच्या परीक्षेत इयत्ता चौथीचे तब्बल २१ विद्यार्थी तर इयत्ता सातवीचे ९ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. या यशामुळे शाळा, शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
इयत्ता चौथीमध्ये गौरी गणगे (२१८ गुण), श्रावणी गणगे (२०४ गुण) आणि अवनी मुळे (१९८ गुण) यांनी विशेष गुणवत्ता प्राप्त केली. तसेच श्रुती खर्जुले, स्वरा काटे, दीदी पवार, आराध्या शेळके, समृद्धी काटे, श्रावणी खामकर, राजवीर शेळके, यश हिवाळे, युवराज शेळके, ईश्वरी घावटे, कल्याणी खर्जुले, ओम शेळके, प्रांजल गणगे, रसिका पारे, सार्थक हिवाळे, स्वरूप काशीद, सार्थक ताकवले व मनस्वी शेळके हे विद्यार्थीही पात्र ठरले.
इयत्ता सातवीमध्ये समृद्धी आरगडे (२१६ गुण), मयुरी निंबाळकर (२१० गुण), श्रेयश शेळके (१९४ गुण) आणि प्रतीक्षा हिवाळे (१९४ गुण) यांनी उल्लेखनीय यश मिळवले. तसेच सिद्धी पन्हाळे, भारती खर्जुले, कमलेश हिवाळे, सर्वज्ञ चव्हाण आणि कृष्णा गणगे यांनीही शिष्यवृत्तीसाठी पात्रता मिळवून शाळेच्या यशात मोलाची भर घातली.
या यशामागे विद्यार्थ्यांची जिद्द, पालकांचे सहकार्य आणि शिक्षकांचे नियोजनबद्ध मार्गदर्शन हे महत्त्वाचे घटक ठरले. विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक मोहनीराज थोरात आणि शरद खरात यांनी सातत्यपूर्ण मार्गदर्शन केले.
या यशाबद्दल नेवासा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी भागीनाथ बडे, केंद्रप्रमुख रवींद्र कडुपाटील, मुख्याध्यापक गणेश पवार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संपत शेळके, उपाध्यक्ष अशोक शेळके यांनी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचे अभिनंदन केले.
तसेच सरपंच कुसुमताई खर्जुले, उपसरपंच विजू घावटे, माजी नायब तहसीलदार दादापाटील शेळके, माजी पंचायत समिती सभापती अशोक शेळके, अहिल्यानगर उत्तर जिल्हा शिवसेना (उबाठा) अध्यक्ष हरिभाऊ शेळके, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब खर्जुले तसेच गळनिंब ग्रामस्थांनीही विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
शाळेत मिशन आरंभ उपक्रमांतर्गत तसेच शालेय स्तरावर नियमित घेतल्या जाणाऱ्या सराव परीक्षा, सातत्यपूर्ण शैक्षणिक नियोजन आणि गुणवत्तावृद्धीच्या उपक्रमांचा विद्यार्थ्यांना मोठा लाभ झाला असून, त्याचेच हे यशस्वी फलित असल्याचे शिक्षकांनी सांगितले.




