*सलाबतपूर (गोपाळनाथ नगर) ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे उद्या प्रस्थान;*
*भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : दिंडी समितीचे आवाहन*

*सलाबतपूर (गोपाळनाथ नगर) ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे उद्या प्रस्थान;*
*भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : दिंडी समितीचे आवाहन*
नेवासा प्रतिनिधी : महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
आषाढी वारीच्या पवित्र परंपरेचा वारसा जपत सलाबतपूर (गोपाळनाथ नगर) येथून श्री क्षेत्र पंढरपूरकडे निघणाऱ्या पायी दिंडी सोहळ्याचे मंगळवार, दि. १४ जुलै रोजी सकाळी ८ वाजता विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, सलाबतपूर (गोपाळनाथ नगर) येथून भक्तिमय वातावरणात प्रस्थान होणार आहे.
टाळ-मृदंगाच्या गजरात, “राम कृष्ण हरी” आणि “ज्ञानोबा-तुकाराम” यांच्या अखंड नामघोषात विठ्ठल भेटीची आस मनात बाळगून वारकरी पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत. हा दिंडी सोहळा दहा दिवसांचा असून संपूर्ण प्रवासात भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळणार आहे.
दिंडीमध्ये दररोज पहाटे काकडा, भजन, दिवसभर वाटचालीदरम्यान गवळणी व अभंग, सायंकाळी हरिपाठ, तसेच मुक्कामाच्या ठिकाणी हरिकीर्तन व भजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे वारकऱ्यांना अखंड नामस्मरणाचा आध्यात्मिक आनंद अनुभवता येणार आहे.
वारकऱ्यांच्या सोयीसाठी दिंडी समितीच्या वतीने सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण, सायंकाळचे चहा-पाणी तसेच मुक्कामाच्या ठिकाणी रात्रीच्या जेवणाची व विश्रांतीची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे.
या पवित्र पायी दिंडी सोहळ्यात सहभागी होऊन श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी सेवा अर्पण करण्यासाठी जास्तीत जास्त वारकरी, भाविक आणि नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन दिंडी समितीच्या वतीने करण्यात आले आहे.




