Breaking
ई-पेपरमहाराष्ट्र

*पंढरीच्या स्वच्छतेसाठी यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे सलग पाचवे वर्ष; सेवाभावातून विठ्ठलभक्तीचा संदेश*

0 8 9 9 8 9

*पंढरीच्या स्वच्छतेसाठी यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे सलग पाचवे वर्ष; सेवाभावातून विठ्ठलभक्तीचा संदेश*

नेवासा तालुका (प्रतिनिधी) :

आषाढी वारीनिमित्त लाखो भाविकांच्या उपस्थितीने गजबजलेल्या पंढरपूरला वारीनंतर पुन्हा स्वच्छ आणि निर्मळ स्वरूप देण्याच्या उद्देशाने यशवंत सामाजिक प्रतिष्ठान, सोनई यांनी राबविलेल्या स्वच्छता अभियानाला यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मा. मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानच्या स्वयंसेवकांनी सलग पाचव्या वर्षी श्रमदान करत सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले.

वारकरी संप्रदायाची परंपरा जपत भक्तीबरोबरच स्वच्छतेलाही तितकेच महत्त्व देण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. वारी संपल्यानंतर पंढरपूर परिसरात साचलेला कचरा, निर्माल्य आणि इतर टाकाऊ वस्तू गोळा करून परिसर स्वच्छ करण्यासाठी स्वयंसेवकांनी दिवसभर परिश्रम घेतले. “स्वच्छ पंढरी, सुंदर पंढरी” हा संकल्प प्रत्यक्ष कृतीत उतरवत त्यांनी सेवेलाच खरी भक्ती मानल्याचे दाखवून दिले.

सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरणपूरक उपक्रमांसाठी ओळखल्या जाणाऱ्या यशवंत सामाजिक प्रतिष्ठानने या मोहिमेद्वारे युवकांमध्ये समाजसेवा, पर्यावरण संवर्धन आणि सार्वजनिक स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचा प्रयत्न केला. या कार्याचे वारकरी, स्थानिक नागरिक आणि विविध स्तरांतून कौतुक करण्यात आले.

उपक्रमादरम्यान पंढरपूरच्या नगराध्यक्षा डॉ. प्रणिता भगीरथ भालके यांनी स्वच्छता मोहिमेला भेट देऊन स्वयंसेवकांचे अभिनंदन केले. “युवकांनी समाजहितासाठी अशा उपक्रमांत सहभागी होणे ही प्रेरणादायी बाब असून, स्वच्छ आणि निर्मळ पंढरपूर घडविण्यात यशवंत सामाजिक प्रतिष्ठानचे योगदान उल्लेखनीय आहे,” असे त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया

“विठ्ठलभक्तीइतकीच पंढरीची स्वच्छता हीदेखील प्रत्येकाची जबाबदारी आहे. सलग पाच वर्षे या अभियानात सहभागी होण्याचे भाग्य आम्हाला लाभले आहे. पुढील काळात अधिकाधिक युवकांनी या सेवाकार्यात सहभागी होऊन स्वच्छ आणि सुंदर पंढरपूर घडविण्यासाठी योगदान द्यावे.”

– उदयन गडाखउपाध्यक्ष, यशवंत सामाजिक प्रतिष्ठान, सोनई

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 8 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे