Breaking
ई-पेपर

*बेलापूर–परळी रेल्वे मार्गाच्या आशा पुन्हा पल्लवित*

*रेल्वे मंत्रालयाकडून प्रकल्पाची तपासणी सुरू; अहिल्यानगरच्या खासदार निलेश लंके यांच्या नव्या जबाबदारीकडूनही अपेक्षा*

0 9 5 0 2 3

*बेलापूर–परळी रेल्वे मार्गाच्या आशा पुन्हा पल्लवित*

*रेल्वे मंत्रालयाकडून प्रकल्पाची तपासणी सुरू; अहिल्यानगरच्या खासदार निलेश लंके यांच्या नव्या जबाबदारीकडूनही अपेक्षा*

नेवासा तालुका प्रतिनिधी –

तब्बल १०४ वर्षांपासून चर्चेत असलेल्या बेलापूर–परळी रेल्वे मार्गाच्या प्रश्नाला आता पुन्हा एकदा गती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या रेल्वे मार्गाच्या प्रकल्पाची तपासणी सुरू असून, तपासणी पूर्ण झाल्यानंतर योग्य निर्णय घेतला जाईल, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना लेखी पत्राद्वारे दिली आहे. त्यामुळे अनेक वर्षांपासून रेल्वेच्या प्रतीक्षेत असलेल्या या भागातील नागरिकांच्या अपेक्षा पुन्हा उंचावल्या आहेत.

बेलापूर–परळी रेल्वे मार्गाचा प्रस्ताव २०२२ पासून रेल्वे बोर्डाच्या पातळीवर मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. हा प्रश्न केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष मार्गावर यावा, यासाठी गेल्या वर्षभरात खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी संसदेत प्रश्न उपस्थित करण्याबरोबरच रेल्वे मंत्रालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला. रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन या मार्गाची या भागाच्या विकासासाठी असलेली गरज आणि जनतेच्या भावना त्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या.

दरम्यान, बेलापूर–परळी रेल्वे कृती समितीनेही आंदोलनाच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधले. फेब्रुवारीमध्ये सलग १३ दिवस आमरण उपोषण, त्यानंतर जूनमध्ये मंत्रालयासमोर आणि ऑगस्टमध्ये पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानासमोर करण्यात आलेल्या आंदोलनामुळे रेल्वे मार्गाचा प्रश्न चांगलाच चर्चेत आला. सातत्याने होत असलेल्या या आंदोलनांची दखल घेत रेल्वे मंत्रालयाकडून आता प्रकल्पाची तपासणी सुरू करण्यात आली आहे.

या रेल्वे मार्गामुळे अहिल्यानगर जिल्ह्यासह मराठवाड्यातील अनेक भागांना थेट दळणवळणाची सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. शेतीमालाची वाहतूक, व्यापार-उद्योग, रोजगार, शिक्षण आणि सर्वसामान्यांचा प्रवास यांना मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे तपासणीच्या पुढील टप्प्यात केंद्र सरकारकडून कोणता निर्णय घेतला जातो, याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.

खासदार निलेश लंके यांच्या निवडीकडे कृती समितीच्या अपेक्षा

अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांची नुकतीच रेल्वे संसदीय स्थायी समितीवर निवड झाली आहे. या नव्या जबाबदारीबद्दल बेलापूर–परळी रेल्वे कृती समितीच्या वतीने खासदार लंके यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. रेल्वेशी संबंधित प्रश्न आणि प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळाल्याने बेलापूर–परळी रेल्वे मार्गाच्या प्रश्नालाही या माध्यमातून अपेक्षित पाठबळ मिळावे, अशी कृती समितीची भूमिका आहे.

खासदार निलेश लंके यांनी संसदीय स्थायी समितीच्या माध्यमातून बेलापूर–परळी रेल्वे मार्गाचा विषय गांभीर्याने पुढे न्यावा, रेल्वे मंत्रालयाच्या पातळीवर आवश्यक पाठपुरावा करावा आणि या प्रकल्पाच्या मंजुरीसाठी आपली भूमिका प्रभावीपणे मांडावी, अशी अपेक्षा कृती समितीने व्यक्त केली आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आता या मार्गाबाबत केवळ तपासणी आणि आश्वासनांपुरता विषय न राहता प्रत्यक्ष निर्णय व्हावा, अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.

मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणे गरजेचे — रितेश भंडारी

“बेलापूर–परळी रेल्वे मार्गासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक होणे आवश्यक आहे. आठ महिन्यांपूर्वी या बैठकीचे आश्वासन मिळाले होते; मात्र अद्याप बैठक झालेली नाही. ज्या लोकप्रतिनिधींनी हे आश्वासन दिले आहे, त्यांनी पुढाकार घेऊन बैठक तातडीने आयोजित करावी,” अशी अपेक्षा बेलापूर–परळी रेल्वे कृती समितीचे अध्यक्ष रितेश भंडारी यांनी व्यक्त केली.

सत्ताधारी लोकप्रतिनिधी असूनही संघर्षाची वेळ — नितीन निकम

“राज्यात विविध नवीन रेल्वे मार्गांना मंजुरी मिळत असून काही प्रकल्पांची कामेही सुरू आहेत. बेलापूर–परळी मार्गावरील बहुतांश लोकप्रतिनिधी सत्ताधारी आहेत. असे असतानाही या भागातील जनतेला आपल्या हक्काच्या रेल्वे मार्गासाठी आंदोलन करावे लागत आहे, ही चिंतेची बाब आहे. आता शासनाने सकारात्मक निर्णय घेऊन या मागणीला मूर्त स्वरूप द्यावे,” अशी अपेक्षा नितीन निकम यांनी व्यक्त केली.

रेल्वे मंत्रालयाची सुरू असलेली तपासणी, खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचा पाठपुरावा आणि आता रेल्वे संसदीय स्थायी समितीवर झालेली खासदार निलेश लंके यांची निवड या पार्श्वभूमीवर बेलापूर–परळी रेल्वे मार्गाच्या प्रश्नाकडे पुन्हा आशेने पाहिले जात आहे. मात्र, गेल्या अनेक दशकांची प्रतीक्षा संपविण्यासाठी आता प्रत्यक्ष मंजुरीचा निर्णय कधी होतो, याकडेच जनतेचे लक्ष आहे.

5/5 - (1 vote)

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 5 0 2 3

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे