
*माजी मंत्री शंकरराव गडाख यांची सलग तिसऱ्या पंचवार्षिकातही कार्यकर्त्यांना नेतृत्वाची संधी; नव्या परंपरेची जपणूक*
नेवासा | प्रतिनिधी- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
मुळा सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी भाऊसाहेब निवृत्ती मोटे तर उपाध्यक्ष (व्हाइस चेअरमन) पदावर बाळासाहेब दादा पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मंगळवार, दि. ७ जुलै २०२६ रोजी प्राधिकृत अधिकारी तथा प्रांताधिकारी सुधीर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड जाहीर करण्यात आली.
निवड जाहीर होताच माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी संचालक मंडळाच्या वतीने नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांचा सत्कार केला. यावेळी माजी चेअरमन नानासाहेब तुवर, माजी उपाध्यक्ष कडूबाळ कर्डिले, नवनिर्वाचित चेअरमन भाऊसाहेब मोटे आदींनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी बोलताना माजी मंत्री शंकरराव गडाख म्हणाले की, “मुळा कारखान्याच्या सभासदांनी आमच्यावर मोठा विश्वास दाखविला आहे. नूतन संचालक मंडळाने सभासद आणि शेतकरी यांना केंद्रस्थानी ठेवून काम करावे. मुळा कारखाना हा केवळ उद्योग नसून संपूर्ण परिसर आणि तालुक्याची कामधेनू आहे. सभासदांनी जास्तीत जास्त ऊस कारखान्याला द्यावा. सभासद व शेतकऱ्यांशी कटिबद्ध राहून काम करण्याची आमची भूमिका कायम राहील.”
आगामी गळीत हंगामाचे नियोजन आपण स्वतः लक्ष घालून करणार असल्याचे सांगत त्यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
मिल रोलरचे पूजन; यंत्रसामग्री वेळेत सज्ज करण्याच्या सूचना
संचालक मंडळाच्या बैठकीचे औचित्य साधून कारखान्यातील मिल रोलरचे विधिवत पूजन करण्यात आले. संचालक पांडुरंग श्रीरंग निपुंगे आणि एकनाथ मारुती जगताप यांच्या हस्ते हा धार्मिक विधी पार पडला.
यावेळी माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना आगामी गळीत हंगामात कोणतेही स्टॉपेज होणार नाही, यासाठी यंत्रसामग्रीची ओव्हरहॉलिंग व देखभाल वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या.
कार्यक्रमास ह.भ.प. देविदास महाराज म्हस्के, विश्वासराव गडाख, दादासाहेब शेळके, कारभारी जावळे, नंदकुमार पाटील, भाऊसाहेब लांडे, भाऊसाहेब निमसे, प्रभाकर कोलते, कैलास जाधव, बाळासाहेब नवले, अरुण सावंत, राजेंद्र सानप, वसंतराव सोनवणे, मदनराव डोळे, कारभारी डफाळ, बाबुराव चौधरी, बबन दरंदले, संजय जंगले, बाळासाहेब गोरे, बाळासाहेब बनकर, कडूबाळ गायकवाड, सोपान पंडित, रंगनाथ जंगले, रमेश जंगले, आप्पासाहेब निमसे, बाबासाहेब आखाडे, गोरक्षनाथ दरंदले, मुकुंद भोगे यांच्यासह संचालक, पदाधिकारी, सभासद, शेतकरी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कारखान्याचे सचिव रितेश टेमक यांनी केले, तर आभार कार्यकारी संचालक शरदराव बेल्हेकर यांनी मानले.
महत्वाचे : सलग तिसऱ्या पंचवार्षिकातही कार्यकर्त्यांनाच नेतृत्वाची संधी
मुळा सहकारी साखर कारखान्यात पदाधिकारी निवडीच्या प्रक्रियेत माजी मंत्री शंकरराव गडाख यांनी सलग तिसऱ्या पंचवार्षिकातही कार्यकर्त्यांना चेअरमन व उपाध्यक्षपदाची संधी देत नेतृत्वाला वाव देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. सहकार क्षेत्रात कार्यकर्त्यांना सर्वोच्च जबाबदारी देण्याचा हा निर्णय उल्लेखनीय मानला जात असून, गडाख यांनी नव्या नेतृत्वाला संधी देण्याचा पायंडाच कायम ठेवला असल्याची चर्चा सभासद व कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे



