Breaking
ई-पेपरमहाराष्ट्रराजकिय

*बेलापूर–परळी रेल्वे मार्गासाठी आता निर्णायक लढा; ९ ऑगस्टपासून पालकमंत्री विखे पाटील यांच्या निवासस्थानासमोर आमरण उपोषण*

*दोनवेळा दिलेली आश्वासने हवेत; कृती समितीचा इशारा – "यावेळी माघार नाही!"*

0 9 0 0 1 5

*बेलापूर–परळी रेल्वे मार्गासाठी आता निर्णायक लढा; ९ ऑगस्टपासून पालकमंत्री विखे पाटील यांच्या निवासस्थानासमोर आमरण उपोषण*

*दोनवेळा दिलेली आश्वासने हवेत; कृती समितीचा इशारा – “यावेळी माघार नाही!”*

नेवासा, प्रतिनिधी :महाराष्ट्र 7न्यूज नेटवर्क

गेली अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या **बेलापूर–परळी रेल्वे मार्गाच्या प्रश्नावर शासन आणि लोकप्रतिनिधींकडून केवळ आश्वासनांची खैरात होत असून प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप करत बेलापूर–परळी रेल्वे कृती समितीने आता निर्णायक आंदोलनाचा इशारा दिला आहे. समितीच्या वतीने दि. ९ ऑगस्ट २०२६ पासून अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या लोणी येथील निवासस्थानासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
कृती समितीने दिलेल्या माहितीनुसार, २०२२ पासून केंद्रीय मंजुरीसाठी प्रलंबित असलेल्या या रेल्वे प्रकल्पासाठी फेब्रुवारी २०२६ मध्ये सलग १३ दिवस आमरण उपोषण करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि नेवाशाचे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही, असा समितीचा आरोप आहे.
त्यानंतर ३० जून रोजी मंत्रालयासमोर पुन्हा आमरण उपोषण करण्यात आले. त्यावेळीही आमदार विठ्ठलराव लंघे यांनी १५ दिवसांत मुख्यमंत्री स्तरावरील बैठक आयोजित करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन स्थगित करण्यात आले. परंतु, एक महिना उलटूनही बैठक न झाल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे.
यावर्षी या प्रश्नावर होणारे हे तिसरे आंदोलन असून, वारंवार आंदोलने करूनही शासन आणि लोकप्रतिनिधींकडून केवळ आश्वासनांपलीकडे काहीच होत नसल्याने जनतेचा संयम संपत चालल्याचे चित्र आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री, खासदार आणि आमदार हे सर्व सत्ताधारी पक्षाचे असतानाही मुख्यमंत्री वेळ देत नसल्याचे कारण पुढे केले जात असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
कृती समितीने स्पष्ट इशारा दिला आहे की, यावेळी केवळ आश्वासनांवर आंदोलन मागे घेतले जाणार नाही. ठोस निर्णय आणि अधिकृत कार्यवाही झाल्याशिवाय उपोषण सुरूच राहील.
या आंदोलनाचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार भाऊसाहेब वाकचौरे, खासदार निलेश लंके, आमदार विठ्ठलराव लंघे तसेच अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक यांना देण्यात आले आहे.
प्रतिक्रिया
रितेश भंडारी म्हणाले :
“शनिशिंगणापूर–राहुरी तसेच नाशिक–पुणे रेल्वे मार्गांसाठी मुख्यमंत्री आणि पालकमंत्री बैठका घेतात. त्या प्रकल्पांसाठी वेळ मिळतो, मात्र बेलापूर–परळी रेल्वे मार्गासाठी वेळ का मिळत नाही? मुख्यमंत्री वेळ देत नाहीत की वेळच मागितली जात नाही, हा जनतेसमोरचा मोठा प्रश्न आहे.”
रज्जाक इनामदार म्हणाले :
“दोनवेळा आश्वासने देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न झाला. जर मुख्यमंत्री वेळ देत नसतील, तर आमदार विठ्ठलराव लंघे यांनी जनतेच्या आंदोलनात सहभागी होऊन आपली भूमिका स्पष्ट करावी.”

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 9 0 0 1 5

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे