Breaking
ई-पेपर

*देवसडेचे डॉ. पंजाबराव उगले, उस्थळ दुमाल्याचे ज्ञानेश्वर वाघ यांना ‘अति-उत्कृष्ट सेवा पदक’*

*३० वर्षांहून अधिक काळाची गुणवत्तापूर्ण सेवा; स्वातंत्र्यदिनी महाराष्ट्र पोलीस दलाच्या दोन्ही अधिकाऱ्यांचा गौरव*

0 8 9 9 1 8

देवसडेचे डॉ. पंजाबराव उगले, उस्थळ दुमाल्याचे ज्ञानेश्वर वाघ यांना ‘अति-उत्कृष्ट सेवा पदक’

३० वर्षांहून अधिक काळाची गुणवत्तापूर्ण सेवा; स्वातंत्र्यदिनी महाराष्ट्र पोलीस दलाच्या दोन्ही अधिकाऱ्यांचा गौरव

नेवासा प्रतिनिधी : नेवासा तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. देवसडे येथील मूळ रहिवासी तथा ठाणे पोलीस आयुक्त डॉ. पंजाबराव उगले आणि उस्थळ दुमाला येथील रहिवासी तथा मुंबई पोलीस दलाच्या गिरगाव विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त ज्ञानेश्वर वाघ यांना महाराष्ट्र पोलीस दलातील उल्लेखनीय, गुणवत्तापूर्ण, दीर्घकालीन व निष्कलंक सेवेसाठी ‘अति-उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर करण्यात आले होते. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या हस्ते दोन्ही अधिकाऱ्यांना हे सन्माननीय पदक प्रदान करण्यात आले.

नेवासा तालुक्यातील दोन सुपुत्रांनी पोलीस सेवेत केलेल्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत त्यांना मिळालेल्या या सन्मानामुळे देवसडे, उस्थळ दुमाला तसेच संपूर्ण नेवासा तालुक्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांच्या दीर्घकालीन, उत्कृष्ट आणि निष्कलंक सेवेची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘उत्कृष्ट सेवा पदक’ आणि ‘अति-उत्कृष्ट सेवा पदक’ प्रदान करण्याची व्यवस्था केली आहे. महाराष्ट्र पोलीस दलातील पात्र अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या गुणवत्तापूर्ण सेवेचा गौरव करण्यासाठी ही पदके प्रदान केली जातात.

डॉ. पंजाबराव उगले हे सध्या ठाणे पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांनी महाराष्ट्र पोलीस दलात तीन दशकांहून अधिक काळ उल्लेखनीय सेवा बजावली आहे. कायदा व सुव्यवस्था, गुन्हे प्रतिबंध, पोलीस प्रशासन आणि जनतेशी समन्वय या विविध क्षेत्रांत त्यांनी प्रभावीपणे काम केले आहे. त्यांच्या दीर्घकालीन आणि गुणवत्तापूर्ण सेवेची दखल घेत त्यांना यापूर्वी २०१८ मध्ये ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ देखील प्रदान करण्यात आले आहे.

उस्थळ दुमाला येथील ज्ञानेश्वर वाघ हे सध्या मुंबई पोलीस दलाच्या गिरगाव विभागात सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. त्यांनीही महाराष्ट्र पोलीस दलात ३० वर्षांहून अधिक काळ उल्लेखनीय सेवा बजावली आहे. त्यांच्या सेवाकाळातील उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत त्यांनाही २०१८ मध्ये ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ प्रदान करण्यात आले होते.

ज्ञानेश्वर वाघ यांच्या कारकिर्दीत आंतरराष्ट्रीय स्तरावरील उल्लेखनीय कामगिरीचीही नोंद आहे. सन २०१५-१६ दरम्यान त्यांनी हैती येथे संयुक्त राष्ट्रांच्या शांततारक्षक अधिकारी म्हणून कर्तव्य बजावले. या आंतरराष्ट्रीय सेवेसाठी त्यांना प्रतिष्ठेचे संयुक्त राष्ट्र पदक (यूएन मेडल) प्रदान करण्यात आले होते.

पोलीस सेवेत प्रदीर्घ काळ प्रामाणिकपणे, कर्तव्यनिष्ठेने आणि गुणवत्तेने सेवा बजावणाऱ्या या दोन्ही अधिकाऱ्यांना आता ‘अति-उत्कृष्ट सेवा पदका’ने सन्मानित करण्यात आल्याने त्यांच्या कार्याचा आणखी एक गौरव झाला आहे. त्यांच्या या यशामुळे नेवासा तालुक्यातील तरुणाईसमोर कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि कठोर परिश्रमातून उच्च शासकीय पदावर पोहोचण्याचा प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे.

देवसडेचे डॉ. पंजाबराव उगले आणि उस्थळ दुमाल्याचे ज्ञानेश्वर वाघ यांना मिळालेल्या या दुहेरी सन्मानाबद्दल नेवासा तालुक्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील सेवाकार्यासाठी विविध स्तरांतून शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

महाराष्ट्र ७ न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 8 9 9 1 8

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे