*अहिल्यानगर जिल्हा नियोजन समितीवर आमदार विठ्ठलराव लंघे यांची नियुक्ती; नेवासा मतदारसंघाला विकासाचे नवे बळ*
नेवासा | प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
अहिल्यानगर जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या जिल्हा नियोजन समितीवर नेवासा मतदारसंघाचे आमदार विठ्ठलराव वकिलराव लंघे यांची नामनिर्देशित सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने सोमवार, दि. ६ जुलै २०२६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार ही नियुक्ती जाहीर करण्यात आली.
शासन निर्णय क्रमांक डीपीसी-2024/प्र.क्र.151/वि-1194/970/का-14-9-अ नुसार विधानमंडळ अथवा संसद सदस्यांमधून नामनिर्देशित सदस्य म्हणून आमदार विठ्ठलराव लंघे (नेवासा) आणि आमदार अमोल खताळ (संगमनेर) यांची निवड करण्यात आली आहे.
जिल्हा नियोजन समिती ही जिल्ह्यातील विकास आराखडा तयार करणे, विविध विभागांच्या योजनांना प्राधान्यक्रम देणे, निधीचे नियोजन करणे आणि विकासकामांवर प्रभावी देखरेख ठेवणे यासाठी महत्त्वाची मानली जाते. अशा समितीवर आमदार विठ्ठलराव लंघे यांची झालेली नियुक्ती ही नेवासा मतदारसंघासाठी विशेष महत्त्वाची मानली जात आहे.
या माध्यमातून नेवासा तालुक्यातील रस्ते, पाणीपुरवठा, सिंचन, शिक्षण, आरोग्य, ग्रामीण विकास आणि इतर पायाभूत सुविधांच्या विकासासाठी अधिक प्रभावीपणे पाठपुरावा करण्याची संधी उपलब्ध होणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. तसेच जिल्हास्तरावरील नियोजन प्रक्रियेत नेवासा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व अधिक सक्षमपणे होणार आहे.
दरम्यान, शासनाने जिल्हा नियोजनाचे ज्ञान असलेले नामनिर्देशित सदस्य तसेच जिल्हा नियोजनाचा अनुभव असलेले विशेष निमंत्रित सदस्य यांचीही नियुक्ती केली आहे. या नियुक्त्यांमुळे अहिल्यानगर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.




