*अहिल्यानगर शहरात वेश्याव्यवसायावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा*
*दोन महिलांची सुटका; ४४ वर्षीय महिलेविरुद्ध गुन्हा दाखल*

अहिल्यानगर शहरात वेश्याव्यवसायावर स्थानिक गुन्हे शाखेचा छापा
दोन महिलांची सुटका; ४४ वर्षीय महिलेविरुद्ध गुन्हा दाखल
अहिल्यानगर | प्रतिनिधी
अहिल्यानगर शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरातून सुरू असलेल्या कथित वेश्याव्यवसायावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून दोन महिलांची सुटका केली. या प्रकरणी झिनत फैय्याजअली महंमद (वय ४४, रा. संजीवनी कॉलनी, पानसरेवाडा, रेल्वेस्टेशन, अहिल्यानगर) हिच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध व्यवसायांविरोधात कारवाई सुरू आहे. त्यानुसार प्रशिक्षणार्थी पोलीस उपअधीक्षक कल्पना पवार व स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदिप दरवडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाची नियुक्ती करण्यात आली होती.
३ सप्टेंबर रोजी पथक कोतवाली पोलीस ठाणे हद्दीत अवैध व्यवसायाची माहिती घेत असताना संजीवनी कॉलनी परिसरात एका घरात वेश्याव्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत कारवाईची तयारी करून खात्री करण्यासाठी पथकातील एका कर्मचाऱ्याला बनावट ग्राहक म्हणून पाठविले.
वेश्याव्यवसाय सुरू असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी पंचांसमक्ष संबंधित घरावर छापा टाकला. यावेळी झिनत फैय्याजअली महंमद हिला ताब्यात घेण्यात आले. घराची झडती घेतली असता दोन महिला आढळून आल्या. चौकशीदरम्यान संबंधित महिलांनी त्यांना वेश्याव्यवसायासाठी आणण्यात आल्याची माहिती पोलिसांना दिल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी दोन्ही महिलांची सुटका केली.
या प्रकरणी झिनत फैय्याजअली महंमद हिच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८४५/२०२६ अन्वये स्त्रिया व मुली यांचे अनैतिक व्यापारास (प्रतिबंध) कायदा, १९५६ मधील कलम ३, ४, ५, ७ व ८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.




