
*मुळा धरण आंदोलन प्रकरणी माजी मंत्री शंकरराव गडाख यांना जामीन*
*१६ जुलै रोजी पुढील सुनावणी; न्यायालयात हजेरी*
नेवासा | प्रतिनिधी- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
मुळा धरणाच्या पाणीप्रश्नी २०२३ मध्ये करण्यात आलेल्या जनआंदोलनप्रकरणी दाखल फौजदारी गुन्ह्यात माजी मंत्री शंकरराव गडाख यांना नेवासा येथील न्यायिक दंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालयाने बुधवारी (दि. ८ जुलै २०२६) जामीन मंजूर केला. या प्रकरणाची पुढील सुनावणी १६ जुलै २०२६ रोजी होणार असून, त्याकडे तालुक्यातील शेतकरी, समर्थक आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
मुळा धरणाच्या पाणीप्रश्नी शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी माजी मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी घोडेगाव चौफुला येथे तीव्र जनआंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनादरम्यान गडाख यांच्यासह प्रमुख आंदोलकांविरोधात विविध कलमान्वये फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी बुधवारी माजी मंत्री गडाख यांनी नेवासा येथील न्यायिक दंडाधिकारी प्रथम वर्ग न्यायालयात हजेरी लावली. न्यायाधीश श्रीमती सुळ यांच्या न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. त्यामुळे पुढील सुनावणीपर्यंत त्यांना दिलासा मिळाला असला, तरी खटल्याच्या कामकाजासाठी प्रत्येक तारखेला न्यायालयात उपस्थित राहावे लागणार आहे.
२०२३ मधील हे आंदोलन तालुक्यात मोठ्या प्रमाणावर गाजले होते. शेतकऱ्यांच्या पाणीप्रश्नावर तोडगा काढण्याच्या मागणीसाठी गडाख यांनी शेतकरी व समर्थकांसह आंदोलन छेडले होते. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा पवित्रा आंदोलकांनी घेतल्याने प्रशासनाने संबंधितांवर गुन्हा दाखल केला होता.
आता या प्रकरणातील न्यायालयीन सुनावणीला वेग आला असून, १६ जुलै रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीकडे तालुक्यातील शेतकरी, समर्थक आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.



