*गुरुपौर्णिमा उत्सवात रामनामाचा जागर; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, योग-संस्कारांचा प्रेरणादायी संदेश*

*गुरुपौर्णिमा उत्सवात रामनामाचा जागर; गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, योग-संस्कारांचा प्रेरणादायी संदेश*

नेवासा (प्रतिनिधी): महाराष्ट्र 7 न्यूज नेटवर्क
हर हर योग – घर घर योग या संकल्पनेतून पतंजली योग समिती, कुकाणा यांच्या वतीने परमपूज्य स्वामी रामदेवजी महाराज यांची गुरुपौर्णिमा भक्तिभाव, योगसाधना आणि संस्कारमय वातावरणात उत्साहात साजरी करण्यात आली. विठ्ठल-रुक्मिणी सभा मंडप येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात योगसाधक, ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाची सुरुवात देसाई (आबा) देशमुख यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर भागवत खराडे (साई ॲग्रो सर्व्हिसेस) यांच्या हस्ते तेरा कोटी रामजप वहीचे वितरण करण्यात आले. तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कुकाणा येथील शिष्यवृत्ती परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थी-विद्यार्थिनींचा पतंजली योग समितीच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमास दिगंबर रिंधे (पतंजली किसान सेवा जिल्हा प्रभारी), काकासाहेब (काकाभाऊ) फोलाने (तहसील पतंजली किसान सेवा प्रभारी), योगशिक्षक पांडुरंग बरे सर, योगशिक्षक प्रशांतजी कासार, ॲड. अजेय रिंधे, बाळासाहेब कचरे (इंजिनियर), प्रशांत बागडे, राजेंद्र देडगावकर, राजेंद्र वर्मा, कुलदीप देशमुख सर, विष्णू फासे, राजेंद्र फासे सर, सौ. मनीषाजी बागडे तसेच सर्व महिला योगी व पुरुष योगी उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व, योगाचे आरोग्यदायी लाभ, भारतीय संस्कृतीतील गुरु-शिष्य परंपरा आणि रामनामाच्या जपाचे आध्यात्मिक महत्त्व यावर मार्गदर्शन केले. योगाबरोबरच नामस्मरण ही मानसिक शांती व आत्मिक उन्नतीची प्रभावी साधना असल्याचे त्यांनी सांगितले.

रामजप वहीचे महत्त्व स्पष्ट करताना काकाभाऊ फोलाने यांनी सांगितले की, वहीतील प्रत्येक ओळीत केवळ “राम राम” हाच शब्द लिहावा. “जय श्रीराम”, “जय जय राम” अथवा इतर कोणताही शब्द लिहू नये. जप पूर्ण श्रद्धेने, मनःपूर्वक आणि शांतचित्ताने करावा. लाल पेनानेच “राम राम” लिहावा, वहीमध्ये कोणतीही खाडाखोड करू नये किंवा ती खराब होणार नाही याची काळजी घ्यावी. दररोज एक पान पूर्ण झाल्यानंतर वही देवघरात किंवा स्वच्छ व पवित्र ठिकाणी ठेवावी. वही पूर्ण झाल्यानंतर ती पतंजली योग समितीकडे जमा करावी, असे आवाहन त्यांनी केले.
योग, संस्कार, शिक्षण आणि अध्यात्म यांचा सुंदर संगम घडविणारा हा गुरुपौर्णिमा उत्सव उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी पतंजली योग समिती, कुकाणा तसेच सर्व योगशिक्षक, महिला योगी, पुरुष योगी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
“करे योग, रहे निरोग” हा संदेश देत कार्यक्रमाची प्रेरणादायी वातावरणात सांगता करण्यात आली.




