आनंदधामात प. पू. श्री प्रवीणऋषिजी म. सा. यांचा 26 जुलै रोजी मंगल प्रवेश; समर्पण यात्रेची जय्यत तयारी*

आनंदधामात प. पू. श्री प्रवीणऋषिजी म. सा. यांचा 26 जुलै रोजी मंगल प्रवेश; समर्पण यात्रेची जय्यत तयारी*

अहिल्यानगर, प्रतिनिधी :महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
जैन समाजाच्या आध्यात्मिक परंपरेतील महत्त्वपूर्ण सोहळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प. पू. श्री प्रवीणऋषिजी म. सा. (आदि ठाणा – २) यांच्या आनंदधाम, अहिल्यानगर येथे रविवारी (दि. 26 जुलै 2026) होणाऱ्या मंगल प्रवेशाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या मंगलमय सोहळ्याच्या निमित्ताने सकल जैन समाजात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या कार्यक्रमानिमित्त सकाळी 8.00 वाजता ‘मंगल समर्पण यात्रा’ काढण्यात येणार असून, अशोक (बाबुराव) बोरा फार्म, विनायकनगर येथून आनंदधामापर्यंत ही यात्रा भक्तिभावाने पार पडणार आहे. शेकडो जैन बांधव, महिला, युवक व भाविक या यात्रेत सहभागी होणार असून, धार्मिक घोषणांनी संपूर्ण परिसर भक्तिमय होणार आहे.
या ऐतिहासिक सोहळ्यास लोकसभा सदस्य डॉ. श्रीकांत शिंदे, विधानपरिषद सदस्य संग्राम जगताप, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील, शिक्षणतज्ज्ञ अॅड. विद्यासागर काकडे तसेच उद्योजक सौरभजी बोरा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
समर्पण चातुर्मास समिती व सकल जैन श्रावक संघ, अहिल्यानगर यांच्या वतीने या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असून, अध्यक्ष अशोक (बाबुराव) बोरा, महामंत्री आदर्श छोगिया, कोषाध्यक्ष विलास कटारिया तसेच समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी भाविकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
धर्म, संयम, अध्यात्म आणि समाजप्रबोधनाचा संदेश देणारा हा मंगल प्रवेश सोहळा जैन समाजासाठी प्रेरणादायी ठरणार असून, अहिल्यानगरच्या धार्मिक व सामाजिक जीवनात एक महत्त्वपूर्ण पर्व ठरेल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.




