*ग्रामीण भागातील ‘कला केंद्रां’वरही डान्स बारप्रमाणे कठोर कारवाई करा; नेवासा आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांची विधानसभेत ठाम मागणी*

*ग्रामीण भागातील ‘कला केंद्रां’वरही डान्स बारप्रमाणे कठोर कारवाई करा; नेवासा आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांची विधानसभेत ठाम मागणी*
नेवासा / प्रतिनिधी- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
महिलांच्या प्रतिष्ठेचे संरक्षण आणि अश्लील नृत्याला प्रतिबंध घालणाऱ्या २०१६ च्या सुधारित विधेयकाचे नेवासा आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी विधानसभेत स्वागत करताना ग्रामीण महाराष्ट्राशी संबंधित एक महत्त्वाचा मुद्दा सभागृहाच्या निदर्शनास आणून दिला.
शहरी भागातील डान्स बारवर जसे कठोर कायदेशीर निर्बंध लागू करण्यात येत आहेत, त्याचप्रमाणे ग्रामीण भागात सुरू असलेल्या तथाकथित ‘कला केंद्रां’मध्ये घडणाऱ्या आक्षेपार्ह प्रकारांवरही प्रभावी नियंत्रण आणण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले.
यावेळी आमदार लंघे पाटील यांनी सरकारला प्रश्न उपस्थित करत, या कला केंद्रांना परवाने नेमके कोणत्या यंत्रणेमार्फत दिले जातात? तसेच नव्या कायद्याच्या कक्षेत या कला केंद्रांचाही समावेश करून त्यांच्यावर डान्स बारप्रमाणेच कठोर नियम लागू करण्यात येणार आहेत का? अशी विचारणा केली.
ग्रामीण महाराष्ट्राची सामाजिक मूल्ये, सांस्कृतिक परंपरा आणि महिलांचा सन्मान अबाधित ठेवण्यासाठी अशा केंद्रांना कायद्याच्या आणि नियमांच्या कठोर चौकटीत आणणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या विषयावर राज्य सरकारने ठोस धोरणात्मक निर्णय घेऊन ग्रामीण भागातील अशा केंद्रांवर प्रभावी नियंत्रण आणावे, अशी मागणी करत हा प्रश्न मार्गी लागेपर्यंत सातत्याने पाठपुरावा करणार असल्याचा निर्धार आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी व्यक्त केला.




