*विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील सुविधांचा लाभ घेऊन यशस्वी व्हावे : जलमित्र सुखदेव फुलारी*

*विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील सुविधांचा लाभ घेऊन यशस्वी व्हावे : जलमित्र सुखदेव फुलारी*
नेवासा प्रतिनिधी – महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड क्षमता असून, योग्य दिशा, सातत्यपूर्ण परिश्रम आणि अभ्यासू वृत्तीच्या बळावर ते कोणत्याही क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करू शकतात. महाविद्यालयातील शैक्षणिक सुविधा, विविध उपक्रम आणि उपलब्ध संधींचा पुरेपूर लाभ घेऊन स्वतःचे व्यक्तिमत्त्व घडवावे, असे प्रेरणादायी प्रतिपादन महाराष्ट्र शासनाच्या विश्वकर्मा गुणवंत पुरस्कार विजेते जलमित्र सुखदेव फुलारी यांनी केले.
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील मारुतरावजी घुले पाटील शिक्षण संस्थेच्या जिजामाता शास्त्र व कला महाविद्यालयात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी दि. ६ ते ११ जुलै २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या ब्रिज कोर्सच्या समारोप समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष लांडगे होते.
यावेळी उपप्राचार्य प्रा. डॉ. रमेश नवल, प्रा. डॉ. नबीलाल सय्यद, प्रा. डॉ. अशोक सागडे, प्रा. डॉ. कुंदन बडधे, प्रा. सरिता नवथर तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ब्रिज कोर्सच्या उद्घाटनप्रसंगी शिक्षण संस्थेचे विश्वस्त प्रा. डॉ. नारायण म्हस्के यांनी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाचे महत्त्व, करिअरच्या विविध संधी आणि सकारात्मक दृष्टीकोन याविषयी मार्गदर्शन केले. तसेच विविध विषयांच्या प्राध्यापकांनी महाविद्यालयीन शिक्षणपद्धती, शैक्षणिक प्रक्रिया, उपलब्ध सुविधा आणि भावी संधींची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली.
यावेळी महाराष्ट्र शासनाचा विश्वकर्मा गुणवंत पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल जलमित्र सुखदेव फुलारी यांचा तसेच प्राणीशास्त्र विभागाचे प्रा. वैभव लाटे यांना पीएच.डी. पदवी प्राप्त झाल्याबद्दल त्यांचा महाविद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
प्राचार्य डॉ. शिरीष लांडगे यांनी महाविद्यालयातील शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक व कौशल्यविकासाच्या विविध सुविधांची माहिती देत विद्यार्थ्यांनी प्रत्येक संधीचा सकारात्मक उपयोग करून उज्ज्वल भविष्य घडवावे, असे आवाहन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. के. एम. चेके यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. डॉ. मोहिनी साठे यांनी केले, तर प्रा. डॉ. काकासाहेब लांडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.



