*साहित्य व कलागौरव पुरस्कारांनी मान्यवरांचा गौरव; आमदार लंघे-पाटील यांनी पुरस्कारार्थींचे केले अभिनंदन*

साहित्य व कलागौरव पुरस्कारांनी मान्यवरांचा गौरव; आमदार लंघे-पाटील यांनी पुरस्कारार्थींचे केले अभिनंदन
अहिल्यानगर राहता | प्रतिनिधी
सहकारी साखर कारखानदारीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त प्रवरानगर येथील डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहात साहित्य व कलागौरव पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला. महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, सातारा अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न झाला.
यावेळी आमदार विठ्ठलराव लंघे-पाटील यांनी साहित्य, कला, नाट्य आणि समाजप्रबोधनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पुरस्कारार्थींचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. साहित्य व कलाक्षेत्रातील मान्यवरांचा गौरव हा नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरतो, असे त्यांनी नमूद केले.
साहित्यसेवा जीवनगौरव पुरस्कार उत्तम कांबळे यांना, उत्कृष्ट साहित्य पुरस्कार संहिता राजन यांच्या ‘चल गं सये वारुळाला’ या कथासंग्रहास, तर विशेष साहित्य पुरस्कार सुरेंद्र दरेकर यांच्या ‘समर ऑफ सेव्हंटी नाईन’ या कादंबरीस प्रदान करण्यात आला.
तसेच कलागौरव पुरस्कार मालती इनामदार, नाट्यसेवा पुरस्कार सचिन शिंदे आणि समाजप्रबोधन पुरस्कार मराठी अभ्यास परिषद, पुणे यांना देण्यात आला. अहिल्यानगर जिल्हा साहित्य पुरस्कार निवृत्ती जोरी यांच्या ‘खटपट’ या आत्मचरित्रात्मक कादंबरीस, तर प्रोत्साहनपर साहित्य पुरस्कार संजय गोर्डे यांच्या ‘शांतीच्या शोधात’ या वैचारिक लेखनास प्रदान करण्यात आला.

यावेळी आमदार लंघे-पाटील यांनी सर्व पुरस्कारार्थींचे मनःपूर्वक अभिनंदन केले. साहित्य, कला आणि समाजप्रबोधनाच्या माध्यमातून समाजाला दिशा देणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा सन्मान करणे ही गौरवास्पद बाब असून, अशा पुरस्कारांमुळे साहित्यिक व कलावंतांना अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळते, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमास जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के-पाटील, आमदार मोनिका राजळे, काशिनाथ दाते, आशुतोष काळे, संग्राम जगताप, अमोल खताळ, प्राजक्त तनपुरे, माजी आमदार लहू कानडे, चंद्रशेखर कदम, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन चंद्रशेखर घुले, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे-पाटील, चेअरमन डॉ. सुजय विखे-पाटील, शालिनीताई विखे-पाटील, ध्रुव विखे-पाटील, अविनाश आदिक, अनुराधा नागवडे, महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, भाजपाचे अध्यक्ष नितीन दिनकर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती.



