‘अशोकराव गायकवाड यांच्यासारखा नेता पुन्हा होणे नाही; त्यांच्या जाण्याने समाज पोरका झाला’ — उदयन गडाख पाटील

‘अशोकराव गायकवाड यांच्यासारखा नेता पुन्हा होणे नाही; त्यांच्या जाण्याने समाज पोरका झाला’ — उदयन गडाख पाटील
नेवासा : प्रतिनिधी —
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटाचे ज्येष्ठ नेते तथा दलित चळवळीतील बुलंद नेतृत्व स्व. अशोकराव गायकवाड यांच्या निधनाने समाजाची मोठी हानी झाली आहे. त्यांच्यासारखा संघर्षशील आणि समाजासाठी झटणारा नेता पुन्हा होणे नाही. त्यांच्या जाण्याने समाज पोरका झाला आहे, अशा शब्दांत युवा नेते उदयन गडाख यांनी स्व. अशोकराव गायकवाड यांना श्रद्धांजली अर्पण केली.
भेंडा ग्रामपंचायतीच्या वतीने तसेच भेंडा बु. परिसरातील नागरिकांच्या सहभागातून स्व. अशोकराव गायकवाड यांच्या स्मृतिप्रित्यर्थ भावपूर्ण श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी युवा नेते उदयन गडाख बोलत होते.
उदयन गडाख म्हणाले की, स्व. अशोकराव गायकवाड यांनी आयुष्यभर वंचित, उपेक्षित आणि शोषित समाजाच्या प्रश्नांसाठी आवाज उठवला. समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी त्यांनी सातत्याने संघर्ष केला. कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चळवळ उभी करण्याचे आणि समाजाला दिशा देण्याचे मोठे काम त्यांनी केले. त्यांच्या निधनाने केवळ एका कुटुंबाची नव्हे, तर संपूर्ण सामाजिक चळवळीची मोठी हानी झाली आहे.
स्व. गायकवाड यांच्या कार्याचा आणि विचारांचा वारसा पुढील पिढीने जपला पाहिजे. समाजातील तरुणांनी त्यांच्या संघर्षातून प्रेरणा घेऊन सामाजिक बांधिलकी जपावी, असे आवाहनही गडाख यांनी यावेळी केले.
कार्यक्रमास मुंबई येथील माजी सहाय्यक पोलीस आयुक्त येशुदास गोर्डे, माजी सभापती पावलस गोर्डे, सुधाकर साळवे, हर्षल गायकवाड, सुनील खरात, मायकल गोर्डे, शामराव सोनकांबळे, गणेशराव गव्हाणे, डॉ. लहानू मिसाळ, नामदेव शिंदे, किसनराव यादव, किशोर मिसाळ, देवेंद्र काळे, बाळू वाघडकर, अरुण गोर्डे, सुजित गोर्डे, अजित गोर्डे, अमित गोर्डे, बाळू गोर्डे, जॉनराव गोर्डे, येडूभाऊ सोनावणे, संजय बनसोडे, भाऊसाहेब खरात, कादरभाई सय्यद, देवीदास आढागळे, दिलीप गोर्डे आदी उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी स्व. अशोकराव गायकवाड यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. त्यांच्या सामाजिक व राजकीय कार्याच्या आठवणींना उजाळा देत उपस्थितांनी त्यांच्या शोकसंवेदना व्यक्त केल्या.




