*लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांच्या २४ व्या पुण्यस्मरणानिमित्त भेंड्यात कीर्तन सेवेचे आयोजन*
लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांच्या २४ व्या पुण्यस्मरणानिमित्त भेंड्यात कीर्तन सेवेचे आयोजन
नेवासा | महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना व ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे संस्थापक, सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ नेते तथा लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांच्या २४ व्या पुण्यस्मरणानिमित्त बुधवार, दि. ८ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता श्रीसंत नागेबाबा भक्तनिवास, भेंडा येथे ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली महाराज कदम (श्रीक्षेत्र आळंदी देवाची) यांच्या सुश्राव्य कीर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाची माहिती ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे कार्यकारी संचालक अनिल शेवाळे यांनी दिली. लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांच्या कार्याचा व समाजसेवेचा कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्यासाठी हा धार्मिक व श्रद्धापूर्वक कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, परिसरातील भाविक, सभासद, शेतकरी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
या कार्यक्रमास ज्ञानेश्वर उद्योग समूहाचे अध्यक्ष तथा माजी आमदार नरेंद्र घुले पाटील, संचालक तथा माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, उपाध्यक्ष काकासाहेब नरवडे, माजी आमदार पांडुरंग अभंग तसेच संचालक मंडळाचे सदस्य व विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांच्या स्मृतींना अभिवादन करत त्यांच्या सहकार, शिक्षण व समाजकारणातील प्रेरणादायी कार्याला उजाळा देणारा हा कार्यक्रम भाविकांसाठी आध्यात्मिक पर्वणी ठरणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.




