*संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थानच्या पालखी सोहळ्यास निशुल्क प्रसिद्धी देणार; नेवासा तालुका एकता पत्रकार संघाचा संकल्प*
*संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थानच्या पालखी सोहळ्यास निशुल्क प्रसिद्धी देणार; नेवासा तालुका एकता पत्रकार संघाचा संकल्प*
नेवासा | प्रतिनिधी- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज मंदिर संस्थानच्या पायी पंढरपूर दिंडी (पालखी) सोहळ्यास नुकतीच शासकीय मान्यता मिळाल्यानंतर या सोहळ्याबाबत भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर नेवासा तालुका एकता पत्रकार संघाने पालखी सोहळ्यासह संस्थानच्या विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांना कोणत्याही प्रकारच्या आर्थिक अपेक्षेशिवाय निशुल्क व व्यापक प्रसिद्धी देण्याचा संकल्प केला आहे.
या संदर्भात ह.भ.प. देविदास महाराज म्हस्के यांची भेट घेऊन पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप गाडेकर यांच्या नेतृत्वाखाली पत्रकारांनी आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी पत्रकार सौरभ मुनोत, सचिन कुरुंद, मंगेश निकम, सुमित पटारे, दादा दरंदले, अभिषेक गाडेकर, गणेश बेल्हेकर, युनूस पठाण, अविनाश येळवंडे, सोमनाथ कचरे तसेच तालुक्यातील अनेक पत्रकार उपस्थित होते.
पत्रकार संघाने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “दिंडी सोहळ्याला शासकीय मान्यता मिळाल्याचे समजताच आम्हा सर्वांना अत्यंत आनंद व अभिमान वाटला. माऊलींचे भक्त म्हणून शासनाच्या या निर्णयाचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो. पालखी सोहळा तसेच संस्थानच्या विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांना आमच्या माध्यमातून शक्य तितकी व्यापक प्रसिद्धी देण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू.”
यासोबतच, “या सेवेसाठी कोणत्याही प्रकारचे मानधन, जाहिरात किंवा आर्थिक अपेक्षा न ठेवता माऊलींची सेवा समजून सर्व बातम्या व उपक्रमांना विनामूल्य प्रसिद्धी देण्यात येईल. माऊलींच्या कार्यात आपल्या परीने योगदान देण्याची ही नेवासा तालुका एकता पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांची नम्र भावना आहे,” असेही निवेदनात नमूद करण्यात आले.
यावेळी अध्यक्ष संदीप गाडेकर यांनी सांगितले की, “संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याला आणि संस्थानच्या सामाजिक-धार्मिक कार्याला समाजापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी पत्रकार संघ सदैव सकारात्मक भूमिका बजावेल. माऊलींच्या सेवेत सहभागी होणे हे आमच्यासाठी भाग्याची बाब आहे.”
शेवटी, “माऊलींच्या कृपेने पायी पंढरपूर दिंडी सोहळा अधिकाधिक यशस्वी होवो,” अशी प्रार्थना व्यक्त करत नेवासा तालुका एकता पत्रकार संघाने संस्थानच्या कार्याला सर्वतोपरी सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.




