“जिथे विज्ञान थांबते, तिथे अध्यात्म सुरू होते” – ह.भ.प. प्रकाशनंदगिरीजी महाराज.

“जिथे विज्ञान थांबते, तिथे अध्यात्म सुरू होते” – ह.भ.प. प्रकाशनंदगिरीजी महाराज
गंगापूर /नेवासा (विशेष प्रतिनिधी):- महाराष्ट्र 7न्यूज वृत्तसेवा
“विज्ञान आपल्याला सुविधा देते, परंतु मन:शांती आणि समाधान हे केवळ अध्यात्मातूनच मिळते. जिथे विज्ञान थांबते, तिथे अध्यात्म सुरू होते,” असा मोलाचा संदेश प्रकाशनंदगिरीजी महाराज यांनी दिला. जामगाव येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता प्रसंगी ते बोलत होते.
आधुनिक युगातील धावपळीच्या जीवनात माणूस भौतिक सुखांच्या मागे धावत असला तरी त्याला खरी शांती आणि समाधान अध्यात्मातूनच प्राप्त होते, असे त्यांनी ठामपणे सांगितले. भगवान श्रीकृष्ण यांच्या चरित्रातून भक्ती, कर्तव्य आणि प्रेम यांचे सुंदर उदाहरण त्यांनी मांडले. कृष्ण म्हणजे केवळ पूजनीय देव नव्हे, तर जीवन जगण्याची एक सुंदर कला आहे, असे त्यांनी प्रभावी शब्दांत स्पष्ट केले.
यावेळी बोलताना त्यांनी आई-वडिलांची सेवा हीच खरी पूजा असल्याचे सांगितले. “आई-वडिलांना सांभाळा, त्यांच्यावर जीव लावा. त्यांच्या आशीर्वादातच जीवनाचे खरे यश दडलेले आहे,” असे भावनिक आवाहन त्यांनी उपस्थितांना केले.
संतांचे मोठेपण शब्दांत मावणारे नसते. त्यांचे जीवन म्हणजे त्याग, प्रेम, करुणा आणि सत्य यांचा साक्षात संगम असतो. त्यांच्या एका ओव्यात, एका अभंगात किंवा एका वचनात संपूर्ण जीवनाला दिशा देण्याची ताकद असते, असेही ते म्हणाले.
सप्ताहाच्या सांगता प्रसंगी भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. वातावरण भक्तिमय आणि उत्साहपूर्ण झाले होते. महाराजांच्या ओजस्वी कीर्तनाने उपस्थित भाविक मंत्रमुग्ध झाले.




