*वांबोरी चारी टप्पा-२ मधून पाण्याच्या मागणीसाठी सुरू असलेले शेतकऱ्यांचे उपोषण आमदार लंघे पाटील यांच्या मध्यस्थीनंतर मागे*
*शिंगवे तुकाई गावाच्या पाणीप्रश्नासाठी सकारात्मक पाठपुराव्याचे आमदारांचे आश्वासन; पाणी पाजून उपोषणाची सांगता*

*वांबोरी चारी टप्पा-२ मधून पाण्याच्या मागणीसाठी सुरू असलेले शेतकऱ्यांचे उपोषण आमदार लंघे पाटील यांच्या मध्यस्थीनंतर मागे*
*शिंगवे तुकाई गावाच्या पाणीप्रश्नासाठी सकारात्मक पाठपुराव्याचे आमदारांचे आश्वासन; पाणी पाजून उपोषणाची सांगता*
अहिल्यानगर | प्रतिनिधी :
वांबोरी चारी टप्पा-२ मधून शिंगवे तुकाई गावाला पाणी मिळावे, या प्रमुख मागणीसाठी अहिल्यानगर येथे सुरू असलेले शेतकरी बांधवांचे उपोषण आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या मध्यस्थीनंतर अखेर मागे घेण्यात आले. आमदारांच्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत उपोषणाची सांगता केली.
उपोषणस्थळी भेट देत आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांनी आंदोलक शेतकरी व ग्रामस्थांशी सविस्तर संवाद साधला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी, पाण्याची गरज आणि प्रलंबित मागण्यांची माहिती जाणून घेतली. शिंगवे तुकाई गावाचा पाणीप्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी संबंधित पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा करून शासनस्तरावर आवश्यक तो पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
आमदार लंघे पाटील यांच्या आश्वासनानंतर शेतकरी बांधवांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. यावेळी आमदारांच्या हस्ते पाणी घेऊन शेतकऱ्यांनी उपोषणाची सांगता केली. त्यामुळे गेल्या काही काळापासून सुरू असलेल्या पाणीप्रश्नावरील आंदोलनाची समाधानकारक वातावरणात सांगता झाली.
याप्रसंगी मुळा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता सौ. सायली पाटील, भाजप जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा यांच्यासह समस्त ग्रामस्थ, शेतकरी बांधव व संबंधित पदाधिकारी उपस्थित होते.
शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही यावेळी आमदार लंघे पाटील यांनी दिली.




