*पिचडगावच्या ‘मुक्ताई बारव’चा पुनरुज्जीवनानंतर लोकार्पण सोहळा उद्या; आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन*

पिचडगावच्या ‘मुक्ताई बारव’चा पुनरुज्जीवनानंतर लोकार्पण सोहळा उद्या; आशिष शेलार यांच्या हस्ते उद्घाटन
नेवासा : नेवासा तालुक्यातील ऐतिहासिक वारसा जपणाऱ्या पिचडगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ‘मुक्ताई बारव’ पुनरुज्जीवन व पुनर्वापर प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा बुधवार, दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३ वाजता जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र शासनाचे सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे मंत्री आशिष शेलार यांच्या शुभहस्ते या ऐतिहासिक वास्तूचे लोकार्पण होणार आहे.

या सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे महसूल, कृषी व जलसंपदा मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच नेवासा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विठ्ठलराव लंघे पाटील हे विशेष उपस्थिती म्हणून कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याची आणि महाराष्ट्राच्या ऐतिहासिक वास्तू वैभवाची साक्ष देणाऱ्या बारवांचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने हा पुनरुज्जीवन व पुनर्वापर प्रकल्प महत्त्वपूर्ण मानला जात आहे. पिचडगाव येथील ‘मुक्ताई बारव’चे जतन, संवर्धन आणि नव्या पिढीसमोर ऐतिहासिक वारसा म्हणून सादरीकरण करण्याच्या दृष्टीने या प्रकल्पामुळे गावाच्या वैभवात भर पडणार आहे.
या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने पिचडगावसह संपूर्ण नेवासा तालुक्यात उत्साहाचे वातावरण असून, ऐतिहासिक वारशाचे जतन आणि संवर्धन याबाबत जनजागृती होण्यासही या कार्यक्रमाची मदत होणार आहे.
या कार्यक्रमाचे स्वागतोत्सुक सेवावर्धिनी, पुणे तसेच ग्रामपंचायत व समस्त ग्रामस्थ, पिचडगाव आहेत. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सेवावर्धिनीचे सचिव सोमदत्त पटवर्धन, कार्याध्यक्ष सुहास लुंकड तसेच पिचडगावच्या सरपंच सौ. उषाताई हजारे यांचे सहकार्य लाभत आहे.
जिल्हा परिषद शाळेचे मैदान, पिचडगाव, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर येथे बुधवार, दि. १९ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता हा लोकार्पण सोहळा होणार आहे. या ऐतिहासिक सोहळ्याला नेवासा तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.




